Belagavi

बेळगाव रेल्वेस्थानकाला छत्रपती शिवरायांचे नाव द्या : म. ए. युवा समिती

Share

 बेळगाव रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सध्या वेगाने सुरु आहे. या रेल्वे स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची तसेच मराठी भाषेत जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर फलक लावावेत अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे.

होय, छत्रपती शिवाजी महाराज आणि बेळगावचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. छत्रपती शिवराय हे येथील सर्वजातीय, सर्वभाषिकांचे आदरणीय आहेत. मराठा लाईट इन्फन्ट्री हे बेळगावचे वैभव आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ हे या इन्फन्ट्रीचे घोषवाक्य आहे. बेळगावात मराठा लाईट इन्फन्ट्रीची स्थापना होऊन यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगाव रेल्वेस्थानकाच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानक असे नाव द्यावे अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे. त्याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्यात मराठी भाषिक लोक अधिक असल्याने जिल्ह्यातील सर्व रेल्वेस्थानकांवर हिंदी व कन्नड सोबतच मराठी भाषेतील फलकही लावावेत अशी मागणी केली आहे. मंगळवारी सकाळी समिती शिष्टमंडळाने बेळगाव रेल्वेस्थानक व्यवस्थापक पी. नागराज यांना याबाबतचे निवेदन सादर केले.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले, ब्रिटिशांनी १९२२मध्ये बेळगावात मराठा इन्फन्ट्रीची स्थापना केली. त्यावेळी सैनिकांची ने-आण करण्यासाठी बेळगावात रेल्वेस्थानक सुरु करण्यात आले. ही इन्फन्ट्री आज बेळगावचे वैभव, शान बनली आहे. तिचे घोषवाक्यही ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ हे आहे. मराठा इन्फन्ट्रीच्या स्थापनेला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानक असे नाव द्यावे यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्यात मराठी भाषा बोलणारे लोक २१%हुन अधिक आहेत. त्यामुळे भाषिक अल्पसंख्यानक कायद्यानुसार जिल्ह्यातील सर्व रेल्वेस्थानकांवर हिंदी व कन्नड सोबतच मराठी भाषेतील फलक लावावेत अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिले आहे असे शेळके यांनी सांगितले.  यावेळी शुभम शेळके यांच्यासमवेत शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, सूरज कुडुचकर, शिवाजी मंडोळकर, कृष्णा मोदगेकर, संतोष कृष्णाचे, श्रीकांत कदम आदी उपस्थित होते.

   

 

Tags: