Hukkeri

अनधिकृत वाळू साठा आणि विक्रीवरून कुटुंबाला धमकी हिडकल जलाशयाच्या बॅकवॉटर मधू वाळूची साठेबाजी हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी आर सी गावातील घटना

Share

हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी आर सी गावात अनधिकृतपणे वाळूची साठेबाजी करत विक्री करण्यासाठी इराप्पा बोरगाली यांच्या कुटुंबाला धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

यमकनमर्डी आर सी गावातील गरीब शेतकरी इराप्पा बोरगाली हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात. तीन मुले, सुना, नातवंडे या सार्यांसहित मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मालकीची काही जमीन असून या जमिनीवर यमकनमर्डी येथील देवप्पा हुन्नूरी नामक इसमाने हिडकल जलाशयातील बॅकवॉटर मधून वाळूसाठा केला आहे. हा वाळूसाठा इराप्पा यांच्या जमिनीवर करण्यात आला असून आता पाऊस पडत असल्याने जमीन नांगरण्यासाठी इराप्पा यांचा मुलगा लक्कण्णा याने देवाप्पाला सदर जमीन रिकामी करण्यासाठी सांगितले. याचा राग मनात धरून देवाप्पाने आपल्या सहकाऱ्यांना घेऊन इराप्पाची पत्नी, मुले आणि सुनांना मारहाण केली आहे. यात कुटुंबातील सदस्य जखमी झाले आहेत. घडल्या प्रकाराबाबत प्रसारमाध्यांना इराप्पाने सांगितले असून लक्कण्णा बोरगली आणि आपण मोलमजुरी करून आयुष्य जगत आहोत. आपल्या जागेत बेकायदेशीर वाळूचा साठा करण्यात आला असून सदर वाळू बाजूला सारण्यासाठी गेले असता दहा जणांहून अधिक लोकांनी एकत्र येऊन आपल्यावर हल्ला चढविला. यासंदर्भात यमकनमर्डी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र याप्रकरणी आपल्याला न्याय मिळाला नाही. देवाप्पाच्या मागे काही राजकीय मंडळी आणि अधिकाऱ्यांचा हात असून आम्हा गरिबांना कोण न्याय देणार? असा सवाल इराप्पाने उपस्थित केलाय. आपल्याला न्याय मिळावा, यासाठी आपण आपल्या कुटुंबासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडणार असल्याचे ते म्हणाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या कशाव्वा बोरगली, प्रज्ञा बोरगली यानी आपल्यासोबत झालेल्या घटनेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. आपल्यासह आपल्या कुटुंबाला जीवाची भीती असून यासाठी देवप्पा हुन्नूरी कारणीभूत असल्याचे इराप्पा बोरगली यांनी सांगितले. शिवाय आपल्यावर हल्ला करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

हुक्केरी येथे राजरोसपणे हे प्रकार घडत आहेत. याप्रकरणी अनेकवेळा प्रसारमाध्यमांवर बातम्या प्रसारित झाल्या आहेत. वारंवार अधिकाऱ्यांचा निदर्शनास हि बाब आणून देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. शिवाय यामागे राजकीय मंडळींचाही हात असल्याचा आरोप होत असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या भागात वाली आहे का असा प्रश्न उपस्थित होते आहे.

Tags: