आम आदमी पक्ष हा काटेरी पक्ष नसून फुलांच्या बागेप्रमाणे असलेला पक्ष आहे. या पक्षात कार्यकर्ते आदर्श कार्यकर्ते म्हणून कार्यरत राहतात, अशी प्रतिक्रिया निवृत्त आयपीएस अधिकारी आणि आपचे नेते भास्कर राव यांनी व्यक्त केली आहे.
शनिवारी मराठा मंदिर येथे आम आदमी पक्ष कार्यकर्त्यांचा समावेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या बाजूने वारे वाहात असून आता आम आदमी पक्षातील कार्यकर्ते नेते होण्यासाठी सज्ज आहेत, अशी प्रतिक्रिया आयपीएस भास्कर राव यांनी व्यक्त केली. यावेळी आपल्या भाषणात बेळगावच्या ‘सावकारांवर’देखील त्यांनी टीका करत आम आदमी पक्षात प्रत्येक कार्यकर्ता हा आदर्श असल्याचे सांगितले. 
दिल्लीतील प्रभावी प्रशासक पाहून पंजाबमध्ये देखील आप ची सत्ता आली आहे. शंभर वर्षांचा इतिहास असलेला काँग्रेस पक्ष मात्र केवळ दोन ठिकाणी अधिकारात आहे. आम आदमी पक्ष आगामी काळात गुजरात, कर्नाटकात देखील उत्तमरीत्या कार्यरत होईल, असा विश्वास भास्कर राव यांनी व्यक्त केला .यानंतर आपचे उत्तर विभागाचे प्रभारी राजकुमार टोपाण्णावर म्हणाले, बेळगावमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे.
याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे संतोष पाटील आत्महत्या प्रकरण! याविरोधात आपण प्रत्येकाने आंदोलन छेडले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष विजय पाटील, शंकर हेगडे, गिरीश बाळेकुंद्री आदींसह अनेक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments