Vijayapura

वाढत्या धार्मिक वादाला विजापुरात जत्रा ठरतेय आदर्श ……

Share

राज्यात सध्या धार्मिक वादाचे पेव फुटले आहे. मात्र याला अपवाद म्हणून विजापूरमधील यात्रा आदर्श ठरत आहे. विजापूर जिल्ह्यातील यात्रोत्सवात मुस्लिम धर्मियांच्यावतीने तेल वाढण्याचे काम निस्सीम भक्तीने केले जाते. या माध्यमातून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन होते.

राज्यात सध्या धार्मिक वाद मोठ्या प्रमाणात सुरु आहे. याचदरम्यान या वादाला अपवाद ठरणारी यात्रा विजापूरमध्ये साजरी होत आहे. यात्रोत्सवात व्यावसाय थाटण्यासाठी मुस्लिम बांधवांना मज्जाव करण्यात येत आहे तर दुसरीकडे मुस्लिम बांधवांच्यावतीने धार्मिक द्वेष न बाळगता केवळ भक्तीच्या हेतूने सेवा करण्यात येत आहे.

विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील बीदरकुंडी गावात संगमेश्वर, मारुतेश्वर यात्रा आयोजित करण्यात येते. १६ एप्रिल रोजी संगमेश्वर रथोत्सव, १७ एप्रिल रोजी मारुतेश्वर पारंपरिक उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी संगमेश्वर रथाला मुस्लिम धर्मियांच्या वतीने तेल वाढण्याची सेवा करण्यात येते. या रथोत्सवाची गावात जय्यत तयारी करण्यात आली असून या गावात असलेल्या ६ हजार लोकसंख्येपैकी १ हजार लोकसंख्या हि मुस्लिम समाजाची आहे.

या गावातील मुस्लिम बांधव रथोत्सवासाठी यथासांग सेवा करतात. सहकुटुंब सहपरिवार सेवा करणाऱ्या मुस्लिम धर्मियांमुळे या गावात कोणताही धार्मिक द्वेष बाळगला जात नाही. संपूर्ण गावात हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन होते शिवाय सर्व बांधव एकोप्याने या गावात नांदतात.धार्मिक द्वेषाला बाजूला सारून विजापूरमध्ये होणारी हि यात्रा खरोखरच आदर्शवत अशी आहे. धर्म, जात भेदभाव बाळगून समाजात तेढ निर्माण करण्याऐवजी एकोपा राखून नांदणाऱ्या या गावकऱ्यांचे सर्वत्रच कौतुक केले जाते.

Tags: