Vijayapura

*संतोष पाटील आत्महत्याप्रकरणी उमेश कत्तींचा काँग्रेसला टोला *

Share

ठेकेदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी प्रतिक्रिया दिली असून प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी काँग्रेस नेत्यांना टोला लगावला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील ठेकेदार संतोष पाटील यांनी आत्महत्या केली असून यासंदर्भात मंत्री ईश्वरप्पा यांना जबाबदार असल्याचे संतोष पाटील यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. याप्रकरणी उमेश कत्ती यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून सदर प्रकरणी अहवाल आल्यानंतर उत्तर देऊ असे सांगितले.

मुख्यमंत्री, पंतप्रधान, नेते यासंदर्भात निर्णय घेतील. मंत्री सुधाकर आणि गोविंद कारजोळ यांच्यावर बेंगळूरमधील ठेकेदार केम्पय्या यांनी केलेल्या विधानासंदर्भात प्रतिक्रिया देताना कत्ती म्हणाले, उद्या माझ्यासह अनेकांची नवे घेऊन असे प्रकार होतील, आरोप करणारे असे अनेक आहेत. परंतु प्रकरणाची चौकशी आणि तपास पूर्ण झाल्यानंतर अहवाल येईल या अहवालानुसार निर्णय आणि कारवाई करण्यात येईल, असे कत्ती म्हणाले.

मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांना काँग्रेस नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्यांसह काँग्रेस पक्षाला कोणतेही काम नसल्याने अशा पद्धतीची कामे ते करत असल्याची टीका त्यांनी केली. सरकारवर आरोप करण्यात येतातच. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर दोषी आढळल्यास कारवाई नक्की करण्यात येईल. आणि दोष आढळून आला नाही तर जनताच काँग्रेसवर कारवाई करेल असे कत्ती म्हणाले.

यासह विजापूर जिल्ह्याच्या मंत्रिपदासंदर्भात तसेच बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासंदर्भात देखील उमेश कत्ती यांनी प्रतिक्रिया दिली असून विभाजन होणे गरजेचे आहे, या मतावर ते ठाम राहिले. बेळगाव जिल्ह्याचे ब्रिटिश कालीन प्रशासकीय विभाजन यानुसार आता बेळगाव चिकोडी बैलहोंगलच नाही तर अथणी, तेलसंग अशापद्धतीनेही विभाजन झाल्यास हरकत नाही. मात्र प्रथम चिकोडी जिल्हा होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.

Tags: