Belagavi

संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी काँग्रेसची निदर्शने बेळगावमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन मंत्री के एस ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी

Share

ठेकेदार संतोष पाटील यांनी के एस ईश्वरप्पा हे आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचे सांगत डेथ नोट लिहिली असून याप्रकरणी मंत्री के एस ईश्वरप्पा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये निदर्शने केली.

केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंत्री के एस ईश्वरप्पायांच्या राजीनाम्याची मागणी केली. भाजप कार्यकारिणीची सभा सुरु असलेल्या खाजगी हॉटेलच्या आजूबाजूला पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा काँग्रेस भवन ते चन्नम्मा चौक, आरटीओ चौक या परिसरात देखील चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी म्हणाले, हे सरकार ४० टक्के कमिशन घेणारे सरकार आहे. आतापर्यंत कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, संतोष पाटील यांच्यासह असणारे अनेक कंत्राटदार या साऱ्यांनी सरकार विरोधात आरोप केले आहेत. संतोष पाटील यांच्यावर झालेल्या अन्यायाप्रमाणेच इतरांवरील अन्यायासाठीही आम्ही असाच पुढाकार घेतो. संतोष पाटील यांच्या आत्महत्येविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. याप्रकरणी संपूर्ण चौकशी होऊन शिक्षा सुनावण्याचा आग्रह यावेळी करण्यात आला.

ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर या संतोष पाटील यांच्या कुटुंबासमवेत उभ्या आहेत. हे राजकारण नाही. मृत्यूचे राजकारण करणे हे आमच्या पक्षाच्या तत्वात बसत नाही असा टोला त्यांनी भाजपाला लगावला. संतोष पाटील यांना ईश्वरप्पा आणि आणखी एका आमदारांनी धमकी दिल्याचे आपल्या कानावर आले असल्याचा नवा गौप्यस्फोट आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला. ()

यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: