अखिल भारतीय वीरशैव महासभेतर्फे बेळगावात बांधण्यात येणाऱ्या मोफत विद्यार्थिनी वसतिगृहाची कोनशिला आज माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याहस्ते बसविण्यात आली.

बेळगावातील सुभाष नगरमध्ये बुधवारी सकाळी वीरशैव लिंगायत विद्यार्थीनींसाठी उभारण्यात येत असलेल्या विद्यार्थिनी वसतिगृहाची कोनशिला आज माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याहस्ते भूमिपूजन करून बसविण्यात आली.
यावेळी कार्यक्रमात बोलताना माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले, विद्यार्थीनींसाठी मोफत तत्वावर वसतिगृह बांधण्याची कल्पना सुसंगत आहे. लवकरच काम पूर्ण होऊन हे वसतिगृह सुसज्ज स्वरूपात तयार होऊ दे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
त्यानंतर बोलताना केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, शिकण्याची इच्छा असूनदेखील अनेक समाजाचे गोरगरीब विध्यार्थी शिक्षणापासून वंचित रहात आहेत. अशा विध्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे मोफत वसतिगृह बांधण्याची योजना आहे. एकूण 300 खोल्यांचे हे वसतिगृह असेल. पिहल्या टप्प्यात 5 कोटी रुपये खर्चातून 75 खोल्यांचे बांधकाम करण्याची योजना आहे. त्याचप्रमाणे बेळगावातील बसवेश्वर चौक उद्यानातील बसवेश्वरांचा जुना पुतळा बदलून नवीन पुतळा आणि चौकाचे सुशोभीकरण 1 कोटी रुपये खर्चातून करण्याची योजना आहे असे कोरे म्हणाले.
कारंजामठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजींच्या सानिध्यात हा कार्यक्रम झाला. यावेळी बृहत उद्योगमंत्री मुरुगेश निराणी, खा. मंगल अंगडी, आ. लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, वीरशैव महासभेच्या जिल्हाध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद, राणी चन्नम्मा महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा आशाताई कोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments