Belagavi

‘राहुल कप’ कब्बडी स्पर्धांना बेळगावमध्ये सुरुवात

Share

बेळगाव जिल्हा अमेचुर कब्बडी असोसिएशन तसेच सतीश जारकीहोळी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव जिल्हा पुरुष आणि महिलांच्या जिल्हा स्तरीय चॅम्पियनशिप राहुल कप कब्बडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मुचंडी गावातील एनएसएफ श्री सिद्धारूढ हायस्कुल येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

मंगळवारी सायंकाळी ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर युवानेते राहुल जारकीहोळी, माजी आमदार रमेश कुडची, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार शाम घाटगे, जिल्हा पंचायत माजी उपाध्यक्ष अरुण कटांबळे, बेळगाव काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नालगट्टी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. २५ वर्षे राजकारणात असलेल्या सतीश जारकीहोळी यांनी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात समाजाभिमुख कार्य केले आहे. कब्बडी असोसिएशनच्या अध्यक्षपदी राहुल जारकीहोळी यांची निवड करून क्रीडा क्षेत्राला नवा आयाम देण्याचा प्रयत्न केल्याचे त्या म्हणाल्या.

देशात सध्या अनेक तरुण बेरोजगार आहेत. त्यांना रोजगार पुरविण्यास सरकार अयशस्वी ठरले आहे. मात्र सतीश जारकीहोळी यांनी अनेक संस्थांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून रोजगार देण्याचे कार्य केले आहे. तरुणांना प्रशिक्षण देऊन विविध ठिकाणी रोजगार मिळवून देण्याचे कार्य केले आहे. अनेक युवक आज परदेशात काम करत असून आर्थिक दृष्ट्या सक्षम होत चालले आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यासंदर्भात आपली मराठीशी बोलताना कब्बडी स्पर्धकांनी सांगितले कि, देशात अनेक ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धांना डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळते असे मत स्पर्धकांनी व्यक्त केले.

यावेळी विविध संघातील कब्बडी पटूंनी प्रेक्षकांची मने वेढली.

राहुल कप अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सुमारे ६५ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा पाहण्यासाठी ३००० हुन अधिक प्रेक्षकांनी हजेरी लावली होती.

Tags: