Belagavi

मंत्री ईश्वरप्पांवर ठपका ठेवत बेळगावच्या कंत्राटदाराची उडुपीत आत्महत्या

Share

ग्रामविकास मंत्री ईश्वरपा यांनी ४०% लाच मागितल्याचा आरोप केलेल्या हिंडलगा (ता. बेळगाव) येथील कंत्राटदार संतोष पाटील याने आपल्या मृत्यूला मंत्री ईश्वरप्पा हेच जबाबदार असल्याची सुसाईड नोट  लिहून आत्महत्या केली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली असून विरोधी पक्षांनी ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

होय, माझ्या मृत्यूला ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा हेच जबाबदार असल्याची सुसाईड नोट प्रसारमाध्यमांना पाठवून संतोष पाटील (हिंडलगा, ता. बेळगाव) या कंत्राटदाराने उडुपी येथील शांभवी लॉजमध्ये आत्महत्या केल्याचे मंगळवारी उघड झाले. व्हाट्स अप संदेशाद्वारे सुसाईड नोट पाठवलेल्या संतोषने आपल्या मृत्यूनंतर आपली पत्नी, मुले याना मदत करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना केले आहे. माझ्या मृत्यूला मित्र जबाबदार नाहीत, मित्रांसोबत मी प्रवासात आहे. त्यांचा याच्याशी काही संबंध नाही असे या संदेशात म्हटले आहे. ‘माझ्या मृत्यूला के. एस. ईश्वरप्पा हेच थेट जबाबदार आहेत. त्यांना चांगली शिक्षा झाली पाहिजे. माझ्या सगळ्या आशा बाजूला ठेवून मी हा निर्णय घेतला आहे. माझी पती, मुलांना सरकारने म्हणजे, माननीय पंतप्रधान आणि मा. मुख्यमंत्री आणि आमचे ज्येष्ठ लिंगायत नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी मदतीचा हात द्यावा. प्रसारमाध्यमांच्या मित्रांना कोटी-कोटी धन्यवाद’ असे संतोष यांनी या संदेशात म्हटले आहे. भाजप कार्यकर्ता असलेला संतोष पाटील मूळचा बेळगाव तालुक्यातील बडस गावचा रहिवासी. गाव सोडून तो बेळगावात रहात होता. तीनच वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले असून त्याला दीड वर्षांचे मूल आहे. त्याच्या आत्महत्येची बातमी कळताच त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.फ्लो

संतोष पाटीलने उडुपी येथील शांभवी लॉजमध्ये आत्महत्या केल्याचे कळताच उडुपीच्या एसपी, एसीपीनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मंगळूरहून न्याय वैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांनीही भेट देऊन नमुने गोळा केले. भावाच्या मृत्यूने क्रोधीत झालेल्या संतोषचा भाऊ प्रशांत पाटील याने बेळगावात कॅम्प पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रशांतने आपल्या धाकट्या भावाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मंत्री ईश्वरप्पा यांना अटक करण्याची मागणी केली. आपल्या भावाच्या मृत्यूला न्याय मिळाला पाहिजे, ईश्वरप्पा यांना अटक होईपर्यंत संतोषचा अंत्यसंस्कार करणार नाही असे डोळ्यात अश्रू आणून सांगितले.

या संदर्भात प्रतिक्रिया देताना मंत्री ईश्वरप्पा यांनी संतोषच्या आत्महत्या प्रकरणात आपली काहीच भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. तो कोण हे देखील मला माहित नाही. माझ्या खात्यावर त्याने आरोप केले होते म्हणून मी न्यायालयात त्याच्यावर खटला दाखल केला आहे. काँग्रेसच्या मागणीमुळे मी राजीनामा देणार नाही. या प्रकरणाची चौकशी होऊ देत असे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणावर बोलताना केपीसीसी अध्यक्ष डी. के शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या म्हणाले, राज्याचे पोलीस महासंचालक जिवंत असतील, कायदा नावाची चीज असेल तर या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे. एफआयआर दाखल झाला पाहिजे. डीएसपी गणपती आत्महत्या प्रकरणात आपले नाव आल्यावर तत्कालीन गृहमंत्री के. जे.जॉर्ज यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आज त्याचप्रमाणे ईश्वरप्पा यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. बाईट+बाईट

या प्रकरणावर भाष्य करताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, संतोषच्या आत्महत्येचा तपास प्रामाणिकपणे करण्यात येईल. मला मिळालेल्या महितीप्रमाणे त्याने उडुपीतील एका लॉजमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला आहे. मंगळूरच्या न्यायवैधक प्रयोगशाळेचे तज्ज्ञ घटनास्थळी गेले आहेत. एसपीनी घटनास्थळी भेट दिली आहे. सर्व बाजूने या प्रकरणाचा तपास करण्यात येईल असे सांगून, ईश्वरप्पा यांनी का राजीनामा द्यावा असा सवाल मुख्यमंत्र्यानी केला.

एकंदर, कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरण मंत्री ईश्वरप्पा यांना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास कसा करतात हे पहावे लागेल.

Tags: