Belagavi

कर्नाटक पोलीस ही राज्याची शान : गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र

Share

कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाच्या विशेष राखीव कॉन्स्टेबल प्रशिक्षणार्थ्यांचा दीक्षांत संचलन समारंभ मंगळवारी बेळगावात उत्साहात पार पडला.

होय, बेळगावातील केएसआरपी दुसऱ्या बटालियनच्या अतिरिक्त प्रशिक्षण केंद्रात राज्य राखीव पोलीस दलाच्या विशेष राखीव पोलीस कॉन्स्टेबल प्रशिक्षणार्थ्यांच्या चौथ्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा मंगळवारी पार पडला. यावेळी गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी संचलनाची पाहणी करून प्रशिक्षणार्थींकडून मानवंदना स्वीकारली.

यावेळी महिला प्रशिक्षणार्थीना राष्ट्रध्वज आणि पोलीस ध्वज हाती घेऊन संचलनात भाग घेतला. यावेळी प्रशिक्षणार्थींना कर्तव्य आणि सेवेची शपथ देण्यात आली.प्रशिक्षणार्थीना उद्देशून बोलताना गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले, कर्नाटक पोलीस ही राज्याची शान आहे. देशाच्या सीमांवर डोळ्यात तेल घालून आमचे सैनिक देशाचे रक्षण करतात. त्याचप्रमाणे आमचे पोलीस जीव धोक्यात घालून देशाची अंतर्गत सुरक्षा सांभाळतात. राज्याच्या विविध पोलीस दलात सुमारे १ लाख पोलीस सेवा बजावत आहेत. लोकांचे जीव, मालमत्तांचे रक्षण ते करतात. स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता दिवसाचे २४ तास दक्षतेने सेवा बजावतात. ही अभिमानाची बाब आहे असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

केएसआरपीचे एडीजीपी अलोककुमार म्हणाले, प्रशिक्षणार्थीना त्यांच्या व्यावसायिक जीवनात उपयोगी पडेल असे सर्वांगीण प्रशिक्षण गेल्या सलग ६ महिन्यात देण्यात आले आहे. महापूर व अन्य आपत्कालीन परिस्थितीशी झुंजण्याचे प्रशिक्षणही त्यांना तुम्हाला दिले आहे. त्याचा वापर करून तुमच्या सेवा काळात प्रामाणिकपणे सेवा बजावा असा सल्ला देऊन प्रशिक्षणार्थीना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर बोलताना केएसआरपी कमांडंट हंजा हुसेन म्हणाले, चौथ्या केएसआरपी तुकडीत 216पैकी 213 प्रशिक्षणार्थ्यांनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यात 13 स्नातकोत्तर पदवीधर, 12 अभियंते, 7 डिप्लोमा इंजिनियर, 2 एमबीए, 2डीएड, 9 आयटीआय, 66 पीयूसी तर 3 एसएसएलसी उत्तीर्ण आहेत. यात 17 माजी सैनिक आहेत हे विशेष. ‘धैर्यम सर्वत्र साधनं’ हे घोषवाक्य असलेल्या कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाला ६ दशकांचा इतिहास आहे. त्याचा भाग बनत असलेल्या प्रशिक्षणार्थींना मैदानी व अन्य खेळांचे आणि नोकरीसाठी अनुकूल उत्तम प्रशिक्षण देण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमाला कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाचे महासंचालक रवी एस., एसपी लक्ष्मण निंबरगी, शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी पोलिसांचे कुटुंबीय, मित्रमंडळी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते.

 

Tags: