देशात आणि राज्यात काँग्रेस सध्या नेतृत्वहीन झाली आहे अशी टीका राज्य भाजप प्रभारी अरुणसिंग यांनी केली.

बेळगावात मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना अरुणसिंग म्हणाले, कर्नाटकात काँग्रेस संपल्यातच जमा आहे. केवळ अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. कर्नाटकात सत्ता मिळवून राज्याचा एटीएमप्रमाणे वापर करून अन्य राज्यात सत्ता मिळवण्याचे मनसुबे काँग्रेस आखत आहे. परंतु राज्यातील जनता त्यांचा हा डाव उधळून लावेल असा विश्वर अरुणसिंग यांनी व्यक्त केला.
४ राज्यांच्या निवडणुकात भाजपने अभूतपूर्व विजय मिळवला आहे. उत्तरप्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोव्यात दुसऱ्यांदा पक्षाचे सरकार आले आहे. त्याचप्रमाणे कर्नाटकातही दुसऱ्या वेळीही १५०हुन अधिक जागा मिळवून पूर्ण बहुमताने भाजपचेच सरकार येईल असा दावा त्यांनी केला. देशातील सामान्य जनता गरीब, शेतकरी पंतप्रधान मोदींच्या बाजूने आहेत. मात्र काँग्रेस भुईसपाट झाली आहे असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींच्या योजना देशातील लोकांना आवडल्या आहेत. मोदी शेतकरी, गोरगरीब, सामान्य जनतेच्या कल्याणासाठी झटत आहेत. कर्नाटकात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यात येईल. उत्तर कर्नाटकाची मोठी समस्या म्हादई लवकरच सोडवण्यात येईल. हा विषय मोठा झाला आहे. त्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे अरुणसिंग म्हणाले.
पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, खा. मंगल अंगडी, माजी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित होते.


Recent Comments