Belagavi

मध्यवर्ती बस स्थानक कामकाजाची आमदारांनी केली पाहणी

Share

बेळगाव स्मार्ट सिटी योजने अंतर्गत सुरु असलेल्या विकासकामात मध्यवर्ती बस स्थानकाचा कायापालट करण्यात येत आहे. मात्र हे कामकाज अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या कामकाजाची पाहणी आज बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांनी केली. यावेळी आमदारांनी बसस्थानकाच्या शेजारील मार्गावर असलेले विक्रेते आणि रिक्षा स्टॅण्ड हटविण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे.

बेळगाव शहरात मध्यवर्ती बसस्थानकाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी आज आमदारांनी मोहीम आखली यावेळी कॅंटोन्मेंट अधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. आमदारांनी अधिकाऱ्यांकडून कामकाजासंदर्भात माहिती घेऊन बसस्थानकाचे कामकाज तातडीने पूर्ण करून उदघाटन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

यावेळी हे कामकाज लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आला. बस स्थानकासमोर असलेले टिपू सुलतान रिक्षा स्टॅण्ड याठिकाणाहून हटविण्याची सूचनाही आमदारांनी केली.

बसस्थानक कामकाजाची पाहणी करून प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले, बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकाच्या कामकाजाची पाहणी आज कॅंटोन्मेंट अधिकारी, पोलीस अधिकारी आणि पालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. हे काम रखडलेल्या स्थितीत असून सभागृहात यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. वर्षभरात हे कामकाज पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र कोरोना आणि अपुऱ्या निधीमुळे हे काम रखडले असल्याचे आमदार म्हणाले.

रखडलेल्या कामकाजासंदर्भात प्रसारमाध्यमांवर अनेकवेळा बातम्या झळकत आहेत. यामुळे स्वतः याठिकाणी भेट देऊन कामकाजाची पाहणी आपण केली असून वर्षभरात हे कामकाज पूर्ण होण्याचे सांगण्यात येत आहे. शहरात प्रीपेड रिक्षा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली असून सध्याचे रिक्षा स्थानक हटविण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्याचे आमदार म्हणाले. पावसाळ्यात प्रवाशांना बसण्यासाठी शेडची निर्मिती, यासह नागरिकांच्या सोयीनुसार सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही आमदार बेनके म्हणाले.

यावेळी आमदारांनी कॅंटोन्मेंट अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. हि जागा कॅंटोन्मेंट च्या हद्दीत येते. इतरांना या परिसरात घरे बांधण्याची परवानगी नाही. यामुळे यापुढे प्रत्येकाने कायद्याचे पालन करावे, अशा सूचना आमदारांनी केल्या.

यावेळी रस्त्यावरील विक्रेत्यांसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार म्हणाले, सदर विक्रेत्यांच्या समस्या पालिका आयुक्तांसमोर मांडण्यात आल्या आहेत. त्यांना पर्यायी व्यवस्था करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. सदर विक्रेत्यांमुळे याठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून जागेअभावी हि समस्या निर्माण होत आहे. यामुळे आता प्रत्येकाने नियमांचे पालन केलेच पाहिजे, असे आमदार म्हणाले.स्मार्ट सिटी योजने अंतर्गत शहरात सुरु असलेली अनेक कामे अशाच पद्धतीने रेंगाळली आहेत. कोरोना, अपुरा निधी, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, कर्मचाऱ्यांचा वेळकाढूपणा या साऱ्या गोष्टी या विलंबाचे कारण आहेत. प्रत्येक कामकाजाच्या ठिकाणी अधिकारी, लोकप्रतिनिधी भेट देत आहेत. मात्र कित्येक ठिकाणी हे कामकाज अशाच पद्धतीने रेंगाळत पडले आहे. वेळोवेळी लोकप्रतिनिधी भेटी देतात, अधिकाऱ्यांना सूचना देतात. मात्र या साऱ्या गोष्टी हवेतच विरत असून स्मार्ट सिटीचे कामकाज पूर्ण होण्याचा मुहूर्त मात्र अद्याप काही मिळत नाही हे विशेष!

Tags: