Vijayapura

बदली झालेल्या शिक्षिकेला बिलगून मुले रडली हमसून !

Share

सगळ्यांच्या आयुष्यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नातं खूप जिव्हाळ्याचं असतं. हे समजून घेऊन विध्यार्थ्यांना माया लावणाऱ्या शिक्षकांवर विद्यार्थीही तितकेच जीवापाड प्रेम करतात. याचीच प्रचिती देणारी घटना विजापूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील बळुती गावातील सरकारी शाळेत घडली.     

होय, बळुती गावातील सरकारी शाळेत गेल्या ११ वर्षांपासून विध्यार्थी घडविणाऱ्या ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा तोरवी यांची नुकतीच त्यांच्या गावाकडील सरकारी शाळेत बदली झाली आहे. त्यानिमित्त त्यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. मात्र यावेळी शाळेतील विध्यार्थी-विद्यार्थिनींच्या डोळ्यात अश्रू आले होते. स्वतःच्या मुलांप्रमाणे विध्यार्थ्यांना प्रेमळ वागणूक देऊन या विद्यार्थीप्रिय शिक्षिकेचा मायेचा हात यापुढे आपल्यावर नसणार या भावनेने त्या कोवळ्या जीवन गलबलून आले होते. म्हणून शिक्षिका प्रतिभा तोरवी यांना बिलगून मुले अक्षरशः हमसून रडत होती. हे दृश्य पाहून पालकांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. पालकांनीही, आमच्या मुलांना तुम्ही स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळून घेत प्रेमाने शिकवले, सावरले, त्यांची मने जिंकलीत, त्यांच्यावर सुसंस्कार केलेत. त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी राहू अशा शब्दांत पालकांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. शिक्षिका प्रतिभा तोरवी या संसाधन व्यक्ती म्हणूनही काम पाहतात. पालक महिलांनी त्यांना हळदी-कुंकू लावून, साडीचोळी देऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार केला. काहींनी त्यांना स्मृतिचिन्ह, भेटवस्तू देऊन आपुलकी व्यक्त केली. शिक्षिका प्रतिभा तोरवी यांनीही मुलांना व्हा-पुस्तके, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्य भेट देऊन चांगला अभ्यास करण्याचा सल्ला दिला.

Tags: