नागपुरातील वीषबीज देशात जातीय सलोखा बिघडवीत आहे. अल्पसंख्यांकांवर थेट हल्ले होत आहेत. हा मनुस्मृतीचा एक भाग आहे अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते बी. के. हरिप्रसाद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर शरसंधान साधले.

रविवारी बेळगावात आल्यावर त्यांनी ‘आपली मराठी’सोबत संवाद साधला. धारवाड, कोलार, रायचूर येथे अल्पसंख्यांकांवर झालेल्या हल्ल्यांसंदर्भात प्रतिक्रिया देताना हरिप्रसाद म्हणाले, हे हल्ले म्हणजे एक मोठे षडयंत्र आहे. दलित, मागास आणि महिलांवर हल्ले होत आहेत. आरक्षण रद्द करण्यासाठी हा खटाटोप सुरु आहे. अल्पसंख्यांकांवर तर थेट हल्ले करण्यात येत आहेत. त्यासाठी बहुसंख्यांकांना भडकावण्यात येत आहे. हा मनुस्मृतीचाच एक भाग आहे. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराच्या नेत्यांचे हे कृत्य निषेधार्ह आहे अशी टीका त्यांनी केली.
देवस्थानाजवळ अन्य धर्मियांना व्यापाराला बंदी घालण्यासंदर्भात हरिप्रसाद म्हणाले, केवळ देवस्थान इमारतीत अशी बंदी घातली होती. रस्त्यावर व्यापार करू नये अशी तरतूद नव्हती. जाती-धर्माच्या नावाने चालविण्यात येणारी हॉटेल्स, दुकाने, बाजार बंद करू देत, १३० कोटी भारतीयांना जगण्याचा समान अधिकार आहे. देशातील वाढती महागाई, दरवाढ लपवण्यासाठी धर्माच्या नावाखाली हे राजकारण करण्यात येत आहे असा आरोप त्यांनी केला. कलिंगडे विकणाऱ्यांवर हल्ला करणारे पळपुटे आहेत. ब्रिटिशांच्या काळात देखील असे पळपुटे होते. ब्रिटिशांना ते मिळालेले होते. ब्रिटिशांकडून पेन्शन खाणारे ते हेच पळपुटे आहेत अशी बोचरी टीका करून याबद्दल राज्यपालांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी हरिप्रसाद यांनी केली.
एकंदर, सरकारचे अपयश लपविण्यासाठी आणि मनुस्मृती राबविण्यासाठीच भाजप व संघ परिवार बहुसंख्यांकांना अल्पसंख्यांकांविरोधात भडकावून जातीय सलोखा बिघडवीत असल्याचा आरोप काँग्रेस नेते हरिप्रसाद यांनी यावेळी केला.


Recent Comments