राज्यात आणि देशात वाढत्या इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीचा विरोध करत केंद्र सरकारच्या निषेधार्थ बेळगावात शनिवारी जिल्हा युवा काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली.

होय, दिवसेंदिवस गगनाला भिडणाऱ्या पेट्रोल-डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. दरवाढीच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करत बेळगावातील चन्नम्मा चौकात जिल्हा युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन छेडले.चौकातील रस्त्यात बसून कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या धिक्काराच्या जोरदार घोषणा देत दरवाढीवर संताप व्यक्त करण्यात आला.
यावेळी बोलताना युवा काँग्रेसचे शहराध्यक्ष सैफ सेठ, उपाध्यक्ष पवन राठोड म्हणाले, केंद्र सरकारने ५ राज्यांतील निवडणुका असल्याने इंधनाच्या दरात कपात केली होती. मात्र निवडणुका संपताच इंधन दरात जबर वाढ केली आहे. या सरकारमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. यापुढे श्रीलंकेसारखी परिस्थिती उदभवू शकते. राज्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र बेजबाबदार विधाने करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या आंदोलनात युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.


Recent Comments