दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दरवाढीमुळे प्रत्येकजण मेटाकुटीला आला आहे. आधी लॉकडाऊन, लॉकडाऊन नंतर सतावणारी आर्थिक चणचण आणि त्यानंतर आता दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई… या साऱ्या घडामोडींमुळे जनतेचे जगणेहि महाग होत चालले आहे. याचाच परिणाम आता विणकर समाजावरदेखील दिसून येत आहे.

आपल्या तान्हुल्याला बाजूला घेऊन साडी विणणारी आई, विद्युत यंत्रमागावर काम करणारी वृद्ध व्यक्ती, आपल्या उदरनिर्वाहासाठी चाललेली हि सारी खटाटोप बेळगाव मधील विणकर समाजाची आहे. बेळगावमधील मलप्रभा नगर येथील विणकर समाजातील एका कुटुंबातील हि दृश्ये आपण पाहात आहोत. बेळगावमध्ये सुमारे १.२५ लाख विणकर आहेत. कोविडमुळे हा व्यवसाय अत्यंत अडचणीत आला. काही विणकरांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. उदरनिर्वाहाची काळजी लागलेल्या विणकरांनी सरकारकडे मदतीसाठी याचनाही केली. परंतु एका हाताने मदत देऊ पाहणाऱ्या सरकारने दुसऱ्या हाती दरवाढ केली आणि हि दरवाढ अनियंत्रित असल्याने याचा फटका आणखीनच या समाजाला बसत आहे. हि दरवाढ केवळ पेट्रोल, डिझेल आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंमध्येच नाही तर पर्यायाने प्रत्येक वस्तूमध्ये झाली आहे. साहजिकच पेट्रोल डिझेलचे दर वाढले कि इतर गोष्टींमध्ये देखील दरवाढ होते. विणकर व्यवसायासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात देखील भरमसाट वाढ झाली आहे. आधी लॉकडाऊन आणि त्यानंतर उद्भवलेल्या आर्थिक समस्या यातच आता हा व्यवसाय मंदावला आहे. काही विणकर आपला व्यवसाय सोडून सध्या गवंडी काम देखील करत आहेत. या अडचणीतून वाट काढणाऱ्या विणकर समाजापुढे आता केवळ उदर्निर्वाहाच नाही तर जगण्याचा प्रश्न देखील आवासून उभा आहे…! 
एकीकडे दरवाढ, दुसरीकडे विजेच्या दरात आकारण्यात येणारी दरवाढ यामुळे गरीब विणकर अडचणीत आला आहे. विणकरांना देण्यात येणाऱ्या विजेवर सबसिडी देण्यात
येते. सुरुवातील १.२५ पैसे दराने प्रति युनिट शुल्क आकारणाऱ्या सरकारने आता यातदेखील दरवाढ केली असून २.६५ पैसे प्रति युनिट विजेसाठी शुल्क भरावे लागत आहेत. यासाठी विणकर समाजाचे नेते परशुराम ढगे यांनी वीज दर निश्चित करण्याची मागणी केली आहे.
लॉकडाऊन नंतर पूर्णतः संकटात आलेला विणकर समाज दरवाढीमुळे पुरता हैराण झाला आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबासहित राबणाऱ्या या समाजातील अनेक विणकरांसमोर अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. विणकर समाजासह आज प्रत्येक सर्वसामान्य नागरिक देखील सरकारपुढे केविलवाण्या सुरात प्रश्न उपस्थित करत आहे…. सांगा आता कसं जगायचं….???


Recent Comments