राज्यात सर्व गोष्टी बिनबोभाट सुरु आहेत. मतांच्या हव्यासापोटी राज्यात एका मागोमाग एक असे विवाद घडून येत आहेत असे मत बबलेश्वर मतदार संघाचे आमदार एम. बी. पाटील यांनी व्यक्त करत भाजप सरकारवर निशाणा साधलाय.

बेंगळूरमध्ये युवकाच्या झालेल्या हत्येसंदर्भात गृहमंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानासंदर्भात त्यांनी टिप्पणी तर केलीच शिवाय हिजाब, काश्मिरी फाईल्स, देवस्थान यात्रोत्सव, हलाल बंदी, अजाण यावर भाजपचे राजकारण सुरु असून हे आगामी निवडणुकीत भाजपासाठी वरदान ठरणार असल्याचे जरी त्यांना वाटत असले तरी राज्यातील जनता समजूतदार आहे, जनता योग्य निर्णय घेईल असे ते म्हणाले.
या सर्व घडामोडींचा परिणाम राज्यातील उद्योग जगतात जाणवत आहे. या साऱ्याचे विपरीत परिणाम दिसून येत आहेत. कर्नाटक हे शांतताप्रिय राज्य आहे. यामुळे जनतेच्या भावनांशी न खेळता, राजकीय स्वार्थ बाजूला सारून असे प्रश्न सामंजस्याने हाताळणे गरजेचे आहे, परंतु भाजप सरकार राजकीय स्वार्थापोटी जातीय सलोखा बिघडविण्याचे काम करत असल्याची टीका एम बी पाटील यांनी केली.
राज्यात विकास ठप्प आहे. सरकारी तिजोरीत पैसे नाही, भुकेल्यांना अन्न पुरवठा होत नाही, अशा अनेक समस्या असून भारताचे रूपांतर श्रीलंकेप्रमाणे होऊ नये अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
राज्य मंत्री मंडळ विस्ताराबाबत बोलताना मंत्री मंडळ विस्तार हा चिंतेचा विषय असल्याचे सांगत राज्य सरकार कर्जाच्या भोवऱ्यात सापडले असल्याचे सांगितले. राज्यात अनेक विभागात ४० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत नाही. या साऱ्या प्रकाराला आता जनता वैतागली असून आगामी निवडणुकीत याचे उत्तर मिळेल, असे एम बी पाटील म्हणाले.
एम बी पाटील पुढे म्हणाले, भाजप सरकार हे ४० टक्क्यांचे सरकार असल्याचे कंत्राटदाराने सांगितले आहे. राज्य आणि देशाचा सर्वनाश होत असून खाऊंगा न खाणे दूंगा म्हणणारे पंतप्रधान आता मूग गिळून गप्प असल्याची टीका करत राज्यातील भ्रष्टाचार पंतप्रधानांना दिसत नसल्याचा आरोपही केला.
आगामी निवडणुकीत काँग्रेसला १४० जागा मिळतील आणि भाजपने उकरून काढलेले वाद हे काँग्रेससाठी प्लस पॉईंट ठरतील, असा दावा एम बी पाटील यांनी केलाय.()


Recent Comments