Belagavi

बेळगाव बाजारात दर कडाडल्याने लिंबू झाला आणखी आंबट !

Share

उन्हाचा तडाखा कमी करण्यासाठी गोरगरिबांना परवडणाऱ्या लिंबाचा उन्हाळ्यात हमखास वापर होतो. मात्र बेळगाव बाजारपेठेत सध्या लिंबाचे दर इंधनाच्या दराचा पाठलाग करू लागले आहेत. त्यामुळे लिंबू आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.

होय, उन्हाळ्यात शरीराला गारवा देणाऱ्या फळांमध्ये लिंबू प्रमुख आहे. उन्हाळ्यात गारवा देण्यासोबतच शरीराला आवश्यक पोषक घटक देणारा लिंबू शरीरातील विषारी द्रव्येही काढून टाकतो. त्यामुळेच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या लिंबूला सगळेचजण प्राधान्य देतात. मात्र यंदा बेळगावकरांसाठी लिंबू आणखीनच आंबट झालाय. बाजारात लिंबूच्या किंमतीगगनाला भिडल्या आहेत. जणू इंधनाच्या दराचा पाठलाग करत आहेत. तब्बल १० रुपयाला एक असा लिंबाचा दर झाल्याने ग्राहक लिंबू खरेदी करताना मागेपुढे पाहू लागले आहेत. ५ लिंबांना ५० रुपये या दराने बेळगाव बाजारात लिंबूची विक्री केली जात आहे. कमी आकाराच्या लिंबाचा दर त्याहून थोडा कमी आहे. विजापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने लिंबाचे मोठे नुकसान केल्याने तेथून लिंबाची आवक कमी झाली आहे. त्यामुळेच दर वधारले आहेत. 

या संदर्भात माहिती देताना लिंबू विक्रेता गुलाम यांनी ‘आपली मराठी’ला माहिती देताना सांगितले की, विजापूर जिल्ह्यात लिंबाचे सर्वाधिक उत्पादन होते. त्यामुळे विजापूरहून लिंबू आणून बेळगाव बाजारपेठेत विक्री केली जाते. मात्र पावसामुळे लिंबाची आवक कमी झाल्याने बाजारात त्याचे दर वाढले आहेत. परिणामी ग्राहक लिंबू खरेदी करताना मागेपुढे पहात आहेत. पुरेशा विक्रीअभावी विक्रेते अडचणीत आले आहेत.

या संदर्भात एका ग्राहकाने सांगितले की, उन्हाळ्यात लिंबूचा रस प्याल्याने थंडावा मिळतो. पण सध्या लिंबाचे दर पेट्रोल-डिझेलप्रमाणे वाढत आहेत. त्या दराने खरेदी करणे आम्हा ग्राहकांना परवडणारे नाही.

एकंदर, लिंबाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या विजापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने लिंबाच्या बागा भुईसपाट केल्याने आवक कमी होऊन दर वाढले आहेत. जे ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे लिंबू आणखीनच आंबट झाला आहे.

 

Tags: