Belagavi

बेळगावात शिवजयंती मिरवणुकीसंदर्भात बैठक

Share

 बेळगावात 4 मे रोजी शिवजयंती उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या चित्ररथ मिरवणुकीसंदर्भात शहरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा 4 मे रोजी शिवजयंती उत्सव साजरा करायचा असून त्यासंदर्भात नियोजनासाठी शिवजयंती चित्ररथ महामंडळाने मंगळवारी सायंकाळी धर्मवीर संभाजीराजे चौकातील जत्तीमठ येथे बैठकीचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी सुनील जाधव होते.

यावेळी सुनील जाधव म्हणाले की, बेळगाव शहर परिसरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सवाला आदर्श रूप देण्याच्या उद्देशाने आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी महामंडळ कार्यरत राहील असे सांगितले. शिवजयंतीची मिरवणूक वेळेत सुरू करावी आणि वेळेत कसे संपवता येईल याचे आपण सर्वांनी काळजी घ्यावी तसेच कसल्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

यतेश हेबाळकर यांनी मिरवणुकीत डीजे व पाश्यात्त्य पद्धतीच्या वाद्यांचा वापर न करता पारंपारिक शिवरायांच्या इतिहासातील सजीव देखावा सादर करावा असे सांगितले. जे. बी. शहापुरकर यांनी पिण्याच्या पाण्याची व अग्निशमन दलाच्या गाडीची, तसेच रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याची सूचना केली. बेळगावच्या शिवजयंतीला अलौकिक परंपरा आहे.  देशभर कुठेही सादर होत नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणात बेळगावात शिवजयंती साजरी केली जाते. त्यामुळे प्रत्येक चित्ररथाच्या सादरीकरणात सर्व सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे. उत्सवाचे गांभीर्य राखत शिवप्रेमींनी पोशाख परिधान करून वर्तमानाचे भान राखावे असे आवाहन साहित्यिक गुणवंत पाटील यांनी केले.

यावेळी प्रसाद मोरे, मेघन लंगरकांडे, राजू शेट्टी यांनी विविध सूचना केल्या. यावेळी निशा कुडे, विनायक हलगेकर, महेश जुवेकर, लोकेश रजपूत, सागर मूतकेकर, श्रीधर देसाई, हेमंत शिंदे, विजय पवार, आकाश धुराजी, राहुल जाधव, विशाल देवगेकर, ओंकार पुजारी, आदित्य पाटील, प्रशांत भातकांडे, किरण हलगेकर, राजन जाधव, हेमंत जांगळे, सारंग राघोचे, रजत नावगेकर, प्रदीप किल्लेकर, रुपेश मंडोळकर, सतीश जुठेकर, संदीप सुकंद, नितीन जाधव यांच्यासह शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Tags: