केंद्र सरकारने देशातील केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांना अडचणीत आणण्याचे तंत्र अवलंबले आहे. यातूनच महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्त केल्याचा महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेने निषेध केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.

होय, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्त करण्याच्या ईडीच्या कारवाईचे बेळगावात आज संतप्त प्रतिसाद उमटले. महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेने या कारवाईचा निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले. संजय राऊत यांच्यावरील कारवाई राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असून ती त्वरित मागे घ्यावी अशी मागणी या निवेदनात केली आहे. 
या संदर्भात बोलताना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले, केंद्र सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना त्रास देण्यास सुरवात केली आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. भाजपबद्दल आम्हाला वैयक्तिक द्वेष नाही. मात्र भाजपला लोकशाहीचा पुरस्कार करता येत नसेल तर किमान लोकशाहीचा गळा तरी घोटू नये. संजय राऊत यांनी, आपल्याकडे भ्रष्टाचाराच्या मार्गाने कमावलेला एक पैसा जरी आढळला तर आपला सारी संपत्ती भाजपला दान देऊ असे म्हटले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अशा सूडबुद्धीने प्रेरित कारवाया थांबवाव्यात. तसेच रौत्यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी अशी मागणी शेळके यांनी केली.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments