Banglore

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यात जलसंपदा मंत्र्यांची भेट

Share

राज्यातील काही सिंचन प्रकल्पाच्या अंमलबजावणीत प्रशासकीय तसेच तांत्रिक अडचणी निर्माण होत असून या अडचणी दूर करण्यासाठी केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे दिल्ली दौऱ्यावर निघाले आहेत.बेंगळूर येथील आर टी नगर येथील निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हि माहिती दिली. आपण मंगळवारी सायंकाळी दिल्ली दौऱ्यावर निघणार असून या दौऱ्यात आपण राज्यातील काही सिंचन प्रकल्पांच्या अम्मलबजावणीसंदर्भात केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. मेकेदाटू, म्हादई, कृष्णा, भद्रा या योजनांसंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. सदर योजनांच्या अंमलबजावणीत प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी निरामय होत असून यासंदर्भात केंदीय जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा करून दबाव टाकण्यात येणार आहे. याचप्रमाणे जीएसटी संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेणार असून संगोळ्ळी रायन्ना शाळेसाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेणार आहे. या सर्व भेटींस्तही अद्याप वेळ निश्चित झाली नसून जेपी नड्डा आणि अमित शहा यांचीही भेट घेण्याची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, कुमारस्वामी हे बेताल वक्तव्य करत आहेत. भाजप हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. कर्नाटकातील जनतेचा भाजपाला आशीर्वाद आहे. लोकहिताच्या दृष्टीने पक्ष कार्यरत असून आगामी काळात उत्तम प्रशासन देण्याचा आपला प्रयत्न आहे. कुमारस्वामींच्या बेताल वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणे शक्य नसून टीव्ही माध्यमांवर दाखविण्यात आलेले काही आदेश हे जुने असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारच्या दुष्टीकोनातून प्रत्येक नागरिक हा समान आहे. शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून सर्व पाऊले उचलण्यात येत असून कोणताही भेदभाव करण्यात येत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

याचप्रमाणे अजाण संदर्भात प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, अजाण संदर्भात उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. स्पीकर किती डेसिबल पर्यंत मर्यादित असावेत याबद्दलही आदेशात नमूद करण्यात आले आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात न्यायालय वेळोवेळी आठवण करून देत असून आपणदेखील पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून, सर्वांच्या विश्वासाने, टप्प्याटप्प्याने आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

हिजाब, हलाल बंदी या विषयांवरून राज्यात आधीच गोंधळ निर्माण झाला आहे. आता पुन्हा एकदा अजाण वरून सुरु झालेल्या राजकारणामुळे राज्यातील वातावरण पुन्हा बिघडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सरकारने या प्रकरणी अत्यंत सामंजस्याने, राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था योग्य रीतीने हाताळून निर्णय घेण्याची गरज आहे असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

Tags: