भारताच्या भौगोलिक लक्षणांच्या आधारावर नवे वर्ष सुरु होणार पहिला दिवस म्हणजेच युगादी किंवा गुढीपाडवा. वसंत ऋतूचे स्वागत करून शेतीच्या पुढील कामांची पूर्वतयारी करण्याचा हा दिवस परंपरेने गुढीपाडवा म्हणून साजरा करण्यात येतो असे गंदिगवाडचे श्री मृत्युंजय स्वामीजी यांनी सांगितले.

बेळगावातील कारंजीमठात 250 व्या शिवानुभव गोष्टी आणि ‘अष्टांग योग-शिवयोग-त्राटक योग’ पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. त्यावेळी व्याख्यान देताना मृत्युंजय स्वामी म्हणाले, जगातील सर्वच धर्मांची त्यांची-त्यांची कॅलेंडर्स आहेत. हिंदू कॅलेंडरनुसार शालिवाहन शकानुसार होणारी कालगणना, नववर्ष गुढीपाडव्यापासून सुरु होते. या दिवसापासूनच धरती हिरवे लेणे ल्यायला सुरवात करते. व्यवहारासाठी जरी आपण इंग्लिश कॅलेंडर वापरत असलो तरी आपल्या संस्कृती-परंपरेनुसार शक कालगणना समजून घेतली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
कारंजामठाचे गुरुसिद्ध स्वामीजी यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम झाले. आशीर्वचन देताना ते म्हणाले, बसवादी शरणांनी सांगितलेला आशय गुढीपाडव्याच्या आचरणात आहे. सगळी दुःखे, संकटे विसरून नव्या वर्षाचे हसतमुखाने स्वागत करण्याचा हा दिवस आहे. गेल्या २ वर्षांत कोरोना संकटाने लोकांचे स्वास्थ्य, आनंद हिरावून घेतला आहे. सगळ्या दुःखातून, संकटातून पार पडून लोकांना सुख-समृद्धी लाभावी अशी प्रार्थना त्यांनी केली.
यावेळी गुरुसिद्ध स्वामीजींच्या हस्ते ‘अष्टांग योग-शिवयोग-त्राटक योग’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी टपाल तिकीट संग्रहाबद्दल सुवर्णपदक मिळवलेल्या प्रसाद हिरेमठ, रौप्य पदक मिळवलेल्या अहना मुकुंद काकतीकर यांचा सन्मान करण्यात आला. उमा संगीत प्रतिष्ठानच्या यांनी युगादी गीते सादर केली. यावेळी लेखक डॉ. राजेंद्र मठद, राजू पडगुरी, क्रांती महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगल मठद आणि सदस्या, समाजसेवक सुरेश यादव, संकल्प फौंडेशनचे अध्यक्ष एन. एस. बिरादार, समता शाळेचे अध्यक्ष शंकर बागेवाडी यांच्यासह अन्य उपस्थित होते.


Recent Comments