Belagavi

कडोली बसवाण्णा यात्रेत मधमाशांचा भाविकांवर हल्ला

Share

बेळगाव तालुक्यातील कडोली येथील बसवाण्णा देवाच्या यात्रेत मधमाशांनी अचानक तुफान हल्ला चढवल्याने सुमारे १५ जण जखमी झाले. यामुळे भाविक भयभित होऊन गोंधळ झाल्याने काही काळ यात्रा विस्कळीत झाली.

दरवर्षीप्रमाणे गुढी पाढव्यानिमित्त यंदाही मोठ्या प्रमाणात यात्रा भरली होती. दुपारनंतर भाविकांची गर्दी सुरु झाली. वाद्यासह सजवलेले अंबिल गाडे जमले होते. संध्याकाळी ५.३० च्या सुमारास देवस्की कमिटी  हक्कदार व ग्रामस्थांच्या उपस्थीतीमध्ये यात्रेच्या मुख्य विधी चालु असतांना मधमाशांनी अचानक तुफान हल्ला चढवला.

या मंदिराला लागूनच मोठे आंब्याचे झाड असुन या झाडावर मधमाशांचे मोहोळ आहे. या झाडाच्या खालीच कापूर-उदबत्ती कुंड असुन देवस्की पंच, हक्कदार मिळून गाऱ्हाणे घालुन पूजा विधी करतांना उदबत्तीचा धुर उठून मधमाशा बिथरल्या. त्यांनी प्रथम झाडावरच बसलेल्या माकडांना दंश केल्याने माकडे या फांदीवरुन त्या फांदीवर उडी मारल्याने संपुर्ण झाडच हलल्याने माशा अधिकच बिथरल्या. त्यांनी बैलजोड्या, भाविकांच्या गर्दीवर तुफान हल्ला चढवल्याने बैलगाड्या पळवण्यात आल्या तर भाविकांनी आपल्या दुचाकी, सायकल व अन्य वाहने तेथेच सोडून पळ काढुन गाव गाठले. तरीही मधमाशांनी त्यांचा पाठलाग केला. यामुळे यात्रा विस्कळीत होऊन बैलजोडी मालक व भाविकांना अर्ध्यावरच माघारी फिरावे लागल्याने निराशा झाली. काही काळ रस्त्यावरील वाहतुकही ठप्प झाली होती. भितीने दोन तास मंदिराकडे कोणही फिरकले नाहीत. नंतर सावकाश भाविकांनी आपली वाहने आणून अंबिल प्रसाद स्विकारला.

 

Tags: