अभ्यासूवृत्ती, मोठा जनसंपर्क आणि बहुजन समाजाच्या विकासाची तळमळ असणारे प्राचार्य एस. वाय. पाटील हे खऱ्या अर्थाने ‘कार्यकर्ते घडविणारे विद्यापीठ‘ होते असे उद्गार चंदगडचे प्रा. आर. पी. पाटील यांनी काढले.

बेळगावातील ज्योती महाविद्यालयात रविवारी प्राचार्य एस. वाय. पाटील पुरोगामी सेवादलातर्फे एस. वाय. पाटील यांच्या १५व्या जन्मदिनानिमित्त त्यांनी ‘साप्ताहिक राष्ट्रवीर’मध्ये लिहिलेल्या लेखांचे संपादित पुस्तक ‘कार्यकर्ते घडविणारे विद्यापीठ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सह्याद्री को-ऑप सोसायटीचे ज्येष्ठ संचालक नारायणराव खांडेकर यांनी ‘कार्यकर्ते घडविणारे विद्यापीठ’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.
याप्रसंगी पुस्तक प्रकाशन करून बोलताना प्रा. आर. पी. पाटील यांनी, प्राचार्य एस. वाय. पाटील यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडून दाखविले. शिस्त आणि अभ्यासूवृत्ती ही प्राचार्य एस. वाय. सरांची वैशिष्ट्ये होती. तेच संस्कार त्यांनी विद्यार्थ्यांवर केले. त्यांच्या संस्कारातून हजारो कार्यकर्ते घडले असे त्यांनी सांगितले.
प्रा. सुरेश पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. बी. जी. गौंडाडकर यांनी परिचय करून दिला. डी. पी. जाधव यांनी आभार मानले. यावेळी प्राचार्य एस. वाय. पाटील पुरोगामी सेवादलाचे उपाध्यक्ष एस. पी. चौगुले, सचिव प्रा. सुरेश पाटील यांच्यासह दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, सह्याद्री सोसायटी, ताराराणी महिला सोसायटीचे कर्मचारी, शिक्षक, विध्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments