नवीन वर्षाची सुरुवात म्हटली कि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह आजची तरुणाई जल्लोष साजरा करते. परंतु हिंदू नववर्षाची सुरुवात मात्र चैत्र महिन्यातील गुढी पाडव्याला होते. आपल्या संस्कृतीतील चालीरीती या पिढीला समजाव्यात यासाठी चिक्कोडी तुक्कानट्टी सरकारी शाळेत अनोखा उपक्रम राबवित गुढी पाडवा साजरा करण्यात आला आहे.

चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याच्या व्याप्तीत येणाऱ्या मुडलगी येथील तुक्कानट्टी सरकारी शाळेत पारंपरिक गुढी पाडवा साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नानाविध आहाराची व्यवस्था करण्यात आली होती. पुरी, लाडू, गुलाबजाम, दही यासह अनेक पक्वान्नांचा लाभ विद्यार्थ्यांना घेता आला. हा सारा माहोल पाहून एखाद्या लग्न समारंभाप्रमाणेच प्रचिती आली. परंतु हा कोणताही लग्नसमारंभ नसून सध्याच्या पिढीला आपल्या चालीरीती, आपल्या परंपरांची कल्पना मिळावी, यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
कॅलेंडरनुसार १ जानेवारी रोजी प्रत्येक जण नवीन वर्षाचे स्वागत करतात. परंतु हिंदू संस्कृतीनुसार चैत्र महिन्याच्या सुरुवातीला गुढी पाडव्यादिवशी नूतन वर्षाचे स्वागत करण्यात येते. गुढी पाडव्यादिवशी होणारे नूतन वर्ष हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. चैत्र महिन्यात होणाऱ्या नैसर्गिक बदलाच्या प्रारंभाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देऊन निसर्गासह आपल्या संस्कृतीबद्दलही महत्व पटवून देण्याचे कार्य या शाळेतील शिक्षकांनी केले आहे. शाळेने केलेल्या या उपक्रमाचे विभागीय शिक्षणाधिकाऱ्यांनीही कौतुक केले आहे. 
विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचे महत्व पटवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालकांनीही कौतुक केले आहे. सध्या पाश्चात्य संस्कृतीचा ट्रेंड रुजत चालला आहे. मोठ्या प्रमाणात तरुणाई पाश्चात्य संस्कृती जपत आहे. मात्र या साऱ्या धामधुमीत आपली संस्कृती मात्र मागे पडत चालली आहे. शाळेच्या शिक्षकांनी आपली संस्कृती, परंपरा आणि चालीरीती आतापासूनच विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी हाती घेतलेला उपक्रम हा खरोखरच कौतुकास्पद म्हणावा लागेल.


Recent Comments