Belagavi

बसव कॉलनी, वैभवनगर रहिवाशांचा पाण्यासाठी एल्गार !

Share

 गेल्या १५ दिवसांपासून बेळगावात पाण्यासाठी हाहाकार सुरु आहे. पाणी पुरवठा खंडित झाल्याने शहरातील बसव कॉलनीतील रहिवाशांनी आज सकाळीसकाळी एल अँड टी कंपनीच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करून संताप व्यक्त केला.

पाण्यासाठी रत्यावर उतरल्या बेळगावच्या महिला

एल अँड टी कम्पनीच्या विरोधात बसव कॉलनी रहिवाशांचा संताप

पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको

होय, बेळगावात उन्हाळ्याच्या तोंडावरच पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. हिडकल डॅममध्ये भरपूर पाणीसाठा असूनदेखील एल अँड टी कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे पेटून उठलेल्या बसव कॉलनीतील रहिवाशांनी आज, गुरुवारी बॉंक्साईट रोडवर रिकाम्या घागरी ठेवून रास्ता रोको केला. पाणी पाहिजे अशा अर्थाच्या घोषणा देत एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात शंख केला. रहिवाशांच्या आंदोलनामुळे बॉंक्साईट रोडसह परिसराती फुल्ल ट्रॅफिक जॅम झाला. 

उत्तरेस आ. अनिल बेनके यांनी दोनच दिवसांपूर्वी महापालिकेत एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक पै पुरवठा सुरळीत करा, नागरिकांची तक्रार आल्यास तुम्हाला झाडाला बांधून घालून चोप देईन असा सज्जड दम भरला होता. पण गेंड्याच्या कातडीच्या एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पावले उचलली नाहीत. त्यामुळे बेळगावची पाणी समस्या जैसे थेच आहे. त्यामुळे नागरिकांचा पारा चढलाय. निदर्शनात सहभागी झालेल्या बसव कॉलनीतील रहिवाशी उमा करजगीमठ यांनी ‘आपली मराठी’सोबत बोलताना सांगितले की, एल अँड टी कंपनी आल्यापासून बेळगावात पाण्याची समस्या वरचेवर निर्माण होत आहे. सगळ्या अधिकाऱ्यांना तक्रार अर्ज, निवेदने दिली आहेत. पण काही फायदा झालेला नाही. बसव कॉलनीतील पाण्याच्या समस्येवर कायमचा तोडगा निघेपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा त्यांनी दिला.

आणखी एका निदर्शक महिलेने सांगितले की, 24X7 पिण्याचे पाणी देऊ असा दावा अधिकारी करतात. पण प्रत्यक्षात पाणीच मिळत नाही अशी स्थिती आहे. बसव कॉलनी, वैभव नगर आदी परिसरात पाणीसमस्या गंभीर झाली आहे. ती कायमची सोडवावी अशी मागणी या महिलेने केली.

त्यानंतर बोलताना बसव कॉलनी रहिवाशी संघाचे अध्यक्ष कल्लप्पा गाणिगेरी म्हणाले, 2004 पासून आम्हाला पाण्याची समस्या जाणवत नव्हती. मात्र गेल्या २/३ वर्षांपासून तीव्र पाणी समस्या उदभवत आहे. गेल्या 15 दिवसांपासून तर पाणीसमस्या बिकट झाली आहे. तक्रार देण्यासाठी फोन केल्यावर एकही अधिकारी फोन उचलत नाही. अधिकाऱ्यांनी आता येथे येऊन पाणीसमस्या सोडविण्याचे आश्वासन दिले पाहिजे अशी अग्नी त्यांनी केली.

यावेळी वैभव नगरच्या एका रहिवाशाने सांगितले की, रात्री पाणी सोडतो, दुपारी पाणी सोडतो असे सांगून चालणार नाही. 24X7 पिण्याचे पाणी देऊ असा दावा अधिकारी करतात. त्यामुळे आम्हाला अखंड पाणी पुरवावे अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, घटनास्थळी एसीपी सदाशिव कट्टीमनी यांनी भेट देऊन निदर्शक रहिवाशांशी चर्चा केली. त्यावेळी रहिवाशांनी पाण्यासाठी आम्हाला तीनवेळा रस्ता रोखावा लागलाय. आज तिसऱ्यांदा रस्ता रोको करतोय. पण एल अँड टी कंपनीचे अधिकारी दखल घेत नाहीयेत असा आक्रोश व्यक्त केला. फ्लो

यानंतर उत्तरचे आ. अनिल बेनके यांनी एल अँड टी कंपनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊनच निदर्शनस्थळी भेट दिली. यावेळी संतप्त रहिवाशांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला. 15 दिवसांपासून वैभवनगर, बसव कॉलनीला पाणी पुरवठा केलेला नाही. 24 तास अखंड पाणी पुरवठा करावयाच्या या भागात साधा 2 ताससुद्धा पाणी पुरवठा केला जात नाही. विचारले तर विजेची समस्या, पंप खराब आहे अशी थातुरमातुर उत्तरे देता असे सांगत रहिवाशानाची अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

यावेळी रहिवाशांना उद्देशून आ. अनिल बेनके म्हणाले, शहराची पाणीसमस्या सोडविण्यासाठी एल अँड टीला 8 दिवसांची मुदत दिली आहे. त्याला 4 दिवस झालेत. येत्या 4 दिवसांत समस्या सोडवून सुरळीत पाणी पुरविले नाही तर मी बोलल्याप्रमाणे त्यांना झाडाला बांधून घालून दाखवतो. या भागाची पाणीसमस्या लवकरच सोडवू असे आश्वासनही आ. बेनके यांनी दिले.

यावेळी एल अँड टी कंपनीचे मॅनेजर सुभाष म्हणाले, गेल्या 10 दिवसांपासून बेळगावात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. टप्प्याटप्प्याने आम्ही ती सोडवत आहोत. या भागाला हिंडाल्कोहुन पाणी येते. तेथील मोटर नादुरुस्त झाली होती. ती काळ दुरुस्त केली आहे. त्यामुळे पाणीसमस्या उदभवणार नाही याची काळजी घेऊ असे त्यांनी सांगितले.

एकंदर, उन्हाळ्याच्या तोंडावरच उदभवलेल्या पाणी समस्येच्या निषेधार्थ बसव कॉलनी, वैभवनगरच्या रहिवाशांनी रास्ता रोको करून प्रशासन आणि एल अँड टी कंपनीला चांगलाच इंगा दाखविला आहे. निदान आता तरी येथील पाणी पुरवठा सुरळीत होणार का हे पहावे लागेल.

 

 

 

Tags: