कोरोना महामारीच्या काळात रुग्णांचे जीव वाचविण्यात महत्वाचे योगदान दिलेल्या बेळगावातील सहारा फौंडेशनतर्फे शिक्षणसंस्था आणि इस्पितळ सुरु करण्याची योजना आखण्यात आली आहे.

बेळगावात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सहारा फौंडेशनचे डॉ. माज म्हणाले, कोरोना काळात फौंडेशनने रुग्णांसाठी मोफत मास्क, ऑक्सिजन सिलेंडर्स, ऍम्ब्युलन्स पुरवली आहेत. गेल्या काही वर्षांपासून सहारा फौंडेशन बेळगावात समाजकार्यात अग्रेसर आहे. कोरोना काळात रुग्णांना मोफत फूड किट्स, जेवण पुरवून अनेक प्रकारची मदत केली आहे. कोरोना लसीकरणासाठी झोपडपट्टी प्रदेशात जागृती मोहीम राबविण्यात आली आहे. 
समाजातील अनेक युवक आज शिक्षणापासून वंचित रहात आहेत. त्यांना उत्तम शिक्षण देण्यासाठी तसेच गोरगरीब रुग्णांवर माफक दरात उपचार करण्यासाठी सहारा फौंडेशन सरकारच्या मदतीने लवकरच शिक्षणसंस्था आणि इस्पितळ सुरु करण्यात येणार आहे. या ठिकाणी गरीब रुग्णांवर केवळ 10 रुपयांत उपचार करण्यात येतील. दररोज 80 रुग्णांची तपासणी करणार असल्याची माहिती डॉ. माज यांनी यावेळी दिली.
यावेळी सहारा फौंडेशनचे अध्यक्ष सलमान शेख, जुबेर शेख, मुस्ताक फारुकी आदी उपस्थित होते.


Recent Comments