देशात साडेचार महिन्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल–डिझेलच्या दरात वाढ करण्यात येत आहे. 22 मार्चला सुरु झालेली इंधन दरवाढ आजही पुन्हा सुरूच राहिली. आज पुन्हा पेट्रोल दरात प्रतिलिटर 80 पैशांची वाढ झाली. त्यामुळे बेळगावकरांनी केंद्र सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.

होय, इंधनाचे दर दररोज वाढतच आहेत. गेल्या 9 दिवसांत पेट्रोलचा दर सरासरी 5 रुपये 60 पैसे इतका वाढला आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर आज प्रतिलिटर 80 पैशानी वाढून 101 रुपये 1 पैसे इतका झालाय. डिझेलच्या दरातही 80 पैशानी वाढ होऊन प्रतिलिटर 92 रुपये 27 पैसे असा दर झाला आहे. मुंबईतही पेट्रोलच्या दरात 84 पैसे तर डिझेलच्या दरात 85 पैसे इतकी वाढ झाली. त्यानंतर पेट्रोलचे दर अनुक्रमे 115रुपये 88 पैसे तर डिझेल दर 100 रुपये 10 पैसे प्रतिलिटर झाला आहे. चेन्नईत पेट्रोल 75 पैसे तर डिझेल 76 पैशांनी महागले. कोलकाता येथे पेट्रोल 86 पैसे तर डिझेल 80 पैशांनी महागले. कर्नाटकाची राजधानी बेंगळूर येथे पेट्रोल 84 पैशांनी वाढून प्रतिलिटर दर 106 रुपये 46 पैसे झाला आहे. तर डिझेल 79 पैशांनी वाढून प्रतिलिटर दर 90 रुपये 49 पैसे झाला आहे. बेळगावातही पेट्रोल-डिझेल महागले असून पेट्रोलचा दर 106रुपये 23 पैसे झाला आहे. तर डिझेलचा दर प्रतिलिटर 90 रुपये 30 पैसे झाला.
इंधनांच्या गगनाला भिडणाऱ्या किंमतींमुळे सर्वसामान्य बेळगावकर हैराण झाले आहेत. ‘आपली मराठी’सोबत बोलताना बेळगावातील नागरिकांनी दरवाढीवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. इंधन दरवाढीमुळे दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे बह वाढत आहेत. आधीच कोविडमुळे आमची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. त्यातच या दरवाढीने आमचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करून इंधन दरवाढ रोखावी अशी मागणी अनेक नागरिकांनी केली.
तेल कंपन्या दररोज सकाळी विविध प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे भाव जाहीर करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारावर हे भाव ठरवले जातात. २२ मार्चपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत वाढ केली जात आहे. आजसुद्धा पुन्हा दरवाढ केली आहे. पहिल्या ४ दिवसांत इंधन दरात दररोज प्रतिलिटर 80 पैसे वाढ करण्यात आली. नंतर पेट्रोलच्या दरात 50 पैसे, 30 पैसे अशी वाढ करण्यात येत आहे. डिझेलच्या दरातही 35 ते 55 पैसे अशी वाढ करण्यात आली आहे. काळ, मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 80आणि 70 पैसे अशी वाढ करण्यात आली. गेल्या 9 दिवसांत पेट्रोल-डिझेलचे भाव सरासरी 5 रुपये 60 इतके वाढले आहेत. इंधनाच्या अशा सलग दरवाढीमुळे बेळगावकर नागरिक पंतप्रधान मोदींच्या नावाने खडे फोडत आहेत. सगळे लोक आपल्या बाजूने आहेत असे समजून मन मानेल तशी इंधन दरवाढ करू नये, असे करत राहिल्यास गरिबांना पॉट भरणे कठीण होऊन जाईल. त्यामुळे मोदींनी गरिबांची थोडी तरी काळजी घ्यावी, पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी कराव्यात अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या.
एकंदर, पेट्रोल-डिझेलच्या रोजच्या दरवाढीने सामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचीही आपोआप दरवाढ होत असल्याने गरिबांच्या खिशाला कात्री लागली आहे. त्यामुळे दरवाढ करू नये अशी मागणी जोर धरू लागली आहे.


Recent Comments