Belagavi

१४ वर्षीय भव्यकुमार गांधी घेणार जैन मुनी दीक्षा; बेळगावात भव्य मिरवणूक

Share

बेळगावात 14 वर्षीय बालक भव्यकुमार श्रेयस गांधी श्वेतांबर जैन समाज मुनिदीक्षा घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

श्वेतांबर जैन समाजात दीक्षा विधीला अनन्यसाधारण महत्व आहे. बेळगावातील नानावादी येथील रहिवासी असलेला 14 वर्षीय बालक भव्यकुमार श्रेयस गांधी श्वेतांबर सर्वसंग परित्याग करून मुनिदीक्षा घेणार आहे. मोह-मायेचा त्याग करून अहिंसा परमोधर्म या सर्वोच्च संदेशाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी एवढ्या लहान वयात त्याने हे पाऊल उचलले आहे. आपले यापुढील संपूर्ण आयुष्य धर्माच्या सेवेसाठी व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी बेळगावात आकर्षक रथातून त्याची सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. पांगुळ गल्लीतील चंद्रप्रभा श्वेतांबर जैन मंदिरापासून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यानंतर पांगुळ गल्ली, खडेबाजार, रामदेव गल्लीसह विविध मार्गांवरून फिरून पांगुळ गल्लीतील चंद्रप्रभा श्वेतांबर जैन मंदिरासमोर या मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीवेळी दीक्षार्थी भव्यकुमार गांधी यांच्याहस्ते रस्त्यात गोरगरीब, गरजुंना दैनंदिन वापराच्या वस्तू, साहित्याचे दान करण्यात आले. त्याचा स्वीकार करून गरजूंनी त्याला तोंडभरून आशीर्वाद दिले. मार्गावर अनेक नागरिकांनी, सुवासिनींनी मिरवणुकीचे स्वागत केले.

वाद्यांच्या तालावर काढलेल्या या मिरवणुकीच्या अग्रभागी युवती, महिला व युवक नृत्य करीत होते. दीक्षार्थी बालकाच्या भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. मिरवणुकीत चंद्रप्रभा श्वेतांबर जैन मंदिराचे अध्यक्ष बाबुलालजी, उत्तमकुमार, ट्रस्टी पोपटलाल, विजय पोरवाल, राजू खोडा यांच्यासह चंद्रप्रभा श्वेतांबर जैन समाजाचे नागरिक, महिला, आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भव्यकुमारचा दीक्षाविधी येत्या 8 मे रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. आज, रविवारी सायंकाळी पांगुळ गल्लीतील चंद्रप्रभा जैन मंदिरात त्याला निरोप देण्यात येणार आहे. भव्यकुमारच्या काकांनीही 20 वर्षांपूर्वी अशाचप्रकारे बेळगावात दीक्षा घेतली होती.

 

Tags: