Belagavi

बेळगावला अवकाळीचा तडाखा; पाण्याची टाकी, खांब कोसळले !

Share

 जोरदार अवकाळी पावसाने शनिवारी दुपारी बेळगाव शहराला चांगलेच झोडपले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी दुचाकी वाहनांवर पडून नुकसान झाल्याची घटना टिळकवाडी परिसरात घडली.

होय, होळीनंतर बेळगाव शहर व तालुक्यात वळवाच्या पावसाने अधूनमधून हजेरी लावण्यास प्रारंभ केला आहे. याआधी मंगळवारी बेळगावात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर आज, शनिवारीही वादळी वाऱ्यासह शहरात पाऊस झाला. टिळकवाडीतील काँग्रेस रोड गांधी गार्डन परिसरातील एका घरावर बसवलेली एक हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी जोरदार वाऱ्यामुळे कोसळली. घरासमोर उभ्या केलेल्या दुचाकी वाहनांवर ही टाकी कोसळल्याने त्याखाली दबून वाहनांचे नुकसान झाले. रेखा कोरिशेट्टी आणि महेश कोरिशेट्टी यांच्या मालकीची ही टाकी आहे.

पावसाने दानम्मा मंदिर महात्मा फुले रोडवर तसेच आरपीडी रोडवर चौकातील खांब कोसळल्याची घटना घडली.  दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बेळगाव शहराचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे वातावरणात उष्मा बऱ्यापैकी जाणवत आहे. आज झालेल्या पावसामुळे उष्म्याने त्रस्त बेळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र घरे आणि दुकानांसमोर लावलेले बोर्ड्स, साहित्य, रस्त्याकडील बॅनर्स, होर्डिंग्स भुईसपाट झाले. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या. अनेक ठिकाणी रस्त्यांवर आणि सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. आज दुपारी झालेल्या या पावसामुळे वाहतूक थंडावली होती. त्याचप्रमाणे नागरिकांनाही थंडावा मिळाला.

 

 

Tags: