घटस्फोटासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज केला होता. आज त्यावर सुनावणी होती. सर्व काही सुरळीत झाले असते तर पती–पत्नी दोघेही सुखासुखी वेगळे झाले असते, सुखाने जगलेही असते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पतीने पत्नीची भरदिवसा कोयत्याने गळा चिरून हत्या केली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. बेळगावात गजबजलेल्या अशोक सर्कलमध्ये शुक्रवारी घडलेल्या या खळबळजनक हत्येबाबत सादर आहे एक रिपोर्ट.

होय, भरदिवसा, भरचौकात पतीनेच पत्नीची कोयत्याने हत्या केल्याच्या घटनेने शुक्रवारी बेळगाव शहर हादरले. सीबीटीजवळील गजबजलेल्या अशोक चौकात हिना कौसर या 21 या विवाहित महिलेचा तिचा पती मंजूर इलाही नदाफ याने चाकूने गळा चिरला. गंभीर जखमी अवस्थेतील हिनाला तातडीने जिल्हा सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र अतिरक्तस्रावामुळे उपचारांचा उपयोग न होता, तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच डीसीपी रवींद्र गडादी यांनी भेट देऊन पाहणी केली. हिनाचा विवाह बैलहोंगल तालुक्यातील देवलापूर गावच्या मंजूरसोबत 4 वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर काही दिवसातच दोघांमध्ये खटके उडू लागले. हा कलह टोकाला जाऊन दोघांमध्ये वरचेवर भांडणे होऊ लागली. त्यामुळे 8 महिन्यांपूर्वी हिनाने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. आज त्या खटल्याच्या सुनावणीसाठी हिना बेळगावात आली होती. त्यावेळी तिचा पाठलाग करून मंजूरने भर चौकात क्रूरपणे तिचा कोयत्याने गळा चिरून खून केला.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करत आरोपी मंजूरला बेड्या ठोकल्या. जिल्हा इस्पितळासमोर हिना कौसरच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश पाहून सर्वांचे डोळे पाणवत होते. मुलीच्या अशा मृत्यूने हिनाची आई शोक करीत होती. याबाबत माहिती देताना हिनाच्या भावाने सांगितले की, आधीपासूनच हिनाला तिचा पती खूप त्रास देत होता. लग्न होऊन मूळ झाले तरी तिच्यावर संशय घेत होता. ज्येष्ठांनी अनेकवेळा सांगून, पंचायत भरवूनही झाले. पण दोघांत समेट न झाल्याने अखेर घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आज कोर्टात त्यावर सुनावणी होणार होती म्हणून गेलो होतो. त्यानंतर पाठलाग करून मंजुरने हिनाचा निर्घृण खून केला असे त्याने सांगितले. 
पती-पत्नीमध्ये वादविवाद, भांडणे असतातच. पण क्रोधाच्या आवेशात, संशयाचे भूत डोक्यात शिरलेल्या मंजूरने अस्वत्थाच्याच पत्नीचा असा निर्घृण खून केला आहे. या घटनेने बेळगाव हादरले आहे. मुलीला गमावून बसलेल्या कुटुंबियांच्या दुःखाला पारावार राहिलेला नाहीय. दरम्यान, या घटनेबाबत माहिती देताना डीसीपी रवींद्र गडादी म्हणाले, अशोक सर्कलमध्ये मंजूर इलाही याने स्वतःची पत्नी हिना कौसर हिचा कोयत्याने गळ्यावर वार करून खून केला आहे. गंभीर जखमी अवस्थेत तिला उपचारांसाठी जिल्हा इस्पितळात दाखल केले होते. तेथे उपचारांचा उपयोग न होता तिचा मृत्यू झाला आहे. लग्नानंतर दोघांमध्ये निर्माण झालेल्या कौटुंबिक कलहामुळे त्याने हा खून केला आहे. या दोघांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला होता. आज दोघेही सुनावणीसाठी आले होते. त्यानंतर न्यायालयातून तिचा पाठलाग करत येऊन मंजुरने अशोक सर्कलमधील लेक व्ह्यू हॉस्पिटलजवळ कोयत्याने वार करून पत्नी हिनाचा खून केला आहे. आरोपीला ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे असे डीसीपी गडाद यांनी सांगितले. कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची हत्या करणे ही घटना हृदयद्रावक आहे. क्रोधाच्या भरात केलेल्या कृत्याने मंजुरने पत्नीला तर संपविलेच पण त्याने स्वतःच स्वतःच्या आयुष्यात काळोख भरून काळकोठडीत डांबून घेतले आहे. मार्केट पोलिसात या खुनाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.


Recent Comments