देवाकडे अनेकजण अनेक गोष्टी मागतात. देवापुढील देणगीपेटीत दान टाकतात. पण आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी थेट देवालाच पत्र लिहिलेले कधी ऐकलेय? होय, जरा विस्मयकारक वाटणारी पण ही सत्य घटना घडली आहे सौंदत्ती रेणुका–यल्लम्मा देवस्थानात !

होय, बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती रेणुका-यल्लम्मा देवस्थानात एक अजब घटना समोर आली आहे. सध्या या देवस्थानातील देणगी पेटीत जमलेल्या देणगीची मोजदाद करण्याचे काम सुरु आहे. त्यावेळी हे अजबगजब पत्र देणगी पेटीत आढळून आले आहे. पत्राच्या अश्यावरून एखाद्या महिलाभक्ताने हे पत्र लिहिले असावे असे स्पष्ट होते. ‘पतीचे दारूचे व्यसन सोडव, पतीला दारुड्या मित्रांच्या संगतीतून बाहेर काढ, दारुड्या मित्रांच्या संगतीत राहण्याची इच्छा त्याला होऊ नये असे कर’ अशा विविध मागण्यांचे साकडे या देवभोळ्या भक्त महिलेने देवीकडे पत्र लिहून घातले आहे. 
हे पत्र तर एक प्रातिनिधिक आहे. पण वेगवेगळ्या मागण्या करणारी आणखीही अशी पत्रे देवस्थानातील हुंडीत आढळून आली आहेत. त्यात प्रामुख्याने, ‘आमच्यापेक्षा १००% अधिक संपत्ती असलेल्या युवकांसोबत माझ्या मुलीचे लग्न ठरून तिचे कल्याण कर, मला पीएसआय हुद्दा मिळू दे, माझ्याकडून कर्ज घेतलेल्यानी तुझ्या कृपेने ते सर्व कर्ज फेडू देत,’ अशी वेगवेगळी गाऱ्हाणी भक्तांनी देवीला पत्र लिहून घातली आहेत.
दरम्यान, या पत्रांव्यतिरिक्त दागदागिने व रोख रक्कमही भक्तांनी देवीला अर्पण केले आहेत. 1 फेब्रुवारी ते 15 मार्च या काळात देवस्थानातील हुंडीत जमलेल्या देणग्या, भेटींची मोजदाद सौंदत्ती तालुका प्रशासनातर्फे करण्यात आली. त्यात 1.30 कोटी रोख रक्कम, 12 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, 30 लाख रुपये किंमतीचे चांदीचे दागिने भक्तांनी दान केल्याचे स्पष्ट झाले आहे.


Recent Comments