क्षय रोगाची लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या सरकारी इस्पितळात जाऊन चाचणी करवून घेऊन उपचार घ्यावेत. हे सर्व उपचार मोफत केले जातात असे आवाहन जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांनी केले.

बेळगावात बुधवारी ‘आपली मराठी’सोबत बोलताना डॉ. शशिकांत मुन्याळ म्हणाले, उद्या क्षय रोग निर्मूलन दिन पाळण्यात येत आहे. बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, आरोग्य व कुटुंब कल्याण खाते, जिल्हा क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम आणि माहिती व जनसंपर्क खात्याच्या वतीने मार्च 24 रोजी जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन म्हणून पाळण्यात येतो. नागरिकांनी क्षयरोगाची प्राथमिक लक्षणे आढळल्यास सरकारी इस्पितळ, प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कफ चाचणी करून घ्यावी, चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास तातडीने उपचार घ्यावेत आणि लवकर बरे व्हावे असा सल्ला त्यांनी दिला. त्याचप्रमाणे क्षयरोग निर्मूलनासाठी परिश्रम घेतलेल्या आरोग्य खात्याचे कर्मचारी आणि जिल्हा प्रशासनाचे त्यांनी आभार मानले. 
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ म्हणाले, क्षयरोगाची लक्षणे दिसून येताच नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. उद्या 24 मार्च रोजी जिल्हा प्रशासनातर्फे जागतिक क्षयरोग दिन पाळण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जनतेत जागृती करण्यात येत आहे. त्यामुळे दोन आठवड्यांहून अधिक काळ कोणाला कफ, कफातून रक्त पडणे, रात्रीच्या वेळी ताप, घाम येणे, थंडी वाजणे अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी जवळच्या सरकारी इस्पितळात जाऊन चाचणी करवून घ्यावी. यासाठी मोफत उपचार करण्यात येतात, ते घेऊन क्षयरोग मुक्त व्हावे असे आवाहन त्यांनी केले. क्षयरोग निर्मूलनासाठीच्या क्षेत्रात राज्यातील 6 जिल्ह्याना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यापैकी बेळगाव जिल्हा एक आहे. बेळगाव जिल्ह्याला रौप्य पदक जाहीर झाले आहे ही अभिमानाची बाब आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.


Recent Comments