Belagavi

संपत्तीच्या लोभाने पत्नीने काढला पतीचा काटा!

Share

मंडोळी रोड भवानीनगर परिसरात राजू दोड्डबोम्माण्णावर या रियल इस्टेट व्यावसायिकाच्या खून प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला असून या खुनात पत्नी भागीदारी असल्याची माहिती पोलीस तपासात मिळाली आहे. पतीच्या इतर विवाहांची माहिती आणि आपल्या मुलांसाठी संपत्तीच्या लोभाने पतीच्या भागीदारी सह्कार्यान्सोबत पत्नीने पतीचा काटा काढला आहे.

१५ मार्च रोजी झालेल्या या खून प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने लावला आहे.

राजू दोड्डबोम्माण्णावर याच्या खुनाची सुपारी खुद्द त्याची पत्नी किरण दोड्डबोम्माण्णावर हिने राजू याचे व्यावसायिक भागीदार शशिकांत शंकरगौडा आणि धरणेंद्र घंटी यांच्या मदतीने दिली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. राजू दोड्डबोम्माण्णावर याच्या खुनासाठी १० लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. किरण, धर्मेंद्र आणि शशिकांत या तिघांना पोलिसांनी अटक केली असून जय कर्नाटक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय रजपूत याच्या नेतृत्वाखाली सुपारी टोळीला राजुची सुपारी देण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या राजुच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याचा खून करण्यात आला असून सदर प्रकरणी पोलिसांनी वेगाने या प्रकरणाचा उलगडा केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण ५ जणांना अटक करण्यात आली असून अद्याप काही आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले

किरण हि राजुची दुसरी पत्नी आहे. राजुच्या इतर लग्नांविषयी तिला माहिती मिळाली. याआधी राजुचा पहिला विवाह झाला असून किरण सोबत दुसरा विवाह त्याने केला होता. यासह किरणला माहिती न देता राजुने तिसरा विवाह देखील केल्याची माहिती किरणला मिळाली. यावरून सातत्याने दोघांमध्ये खटके उडत असत. राजुचा खून केल्यास राजुची संपत्ती आपल्याला मिळेल, या उद्देशाने तिने हा कट इतर साथीदारांच्या मदतीने रचला. शिवाय धर्मेंद्र आणि शशिकांत यांच्याकडून राजुने काही आर्थिक मदत देखील घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. किरणने उचललेल्या या पावलावर तिच्यासह या खुनात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राजुची पहिली पत्नी उमा आणि तिसरी पत्नी दीप यांनी केली आहे.

वैयक्तिक द्वेष, संपत्तीचा मोह आणि आर्थिक व्यवहारातून राजुचा काटा काढण्यात आला आहे. याप्रकरणी दहा लाखांची सुपारी देऊन सराईत गुन्हेगारांना हाताशी धरून करण्यात आलेल्या खुनाचा छडा अवघ्या ८ दिवसातच पोलिसांनी लावला आहे.

Tags: