घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयात साजरी केलीच पाहिजे. जे कोण आंबेडकर जयंती साजरी करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा कडक इशारा जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी दिला.

बेळगावात जिल्हा पंचायत सभागृहात सोमवारी १४ एप्रिलला असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारीची बैठक झाली. यावेळी विविध दलित नेत्यांनी सांगितले की, गेली २ वर्षे कोरोनामुळे साध्या पद्धतीने आंबेडकर जयंती साजरी करावी लागली होती. पण आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने यंदा भव्य प्रमाणात जयंती साजरी करावी. तसेच शहरातील सर्व चौकांचे विजेच्या दिव्यांच्या माळांनी सुशोभीकरण करावे, जयंतीनिमित्त शुभेच्छांचे बॅनर लावण्यास परवानगी द्यावी, शाळा-महाविद्यालयात १० एप्रिलला विध्यार्थ्यांना निकाल गुणपत्रिका देण्यात येतात. त्याऐवजी १४ एप्रिलनंतर रिझल्ट देण्यास सांगून शाळा-महाविद्यालयातही आंबेडकर जयंती साजरी करण्याचा आदेश काढावा अशी मागणी दलित नेत्यांनी केली. यंदा भगवान महावीर आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिललाच एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे दोन्ही महापुरुषांची जयंती भव्य प्रमाणात साजरी करून सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. त्याशिवाय ‘जिल्हाधिकाऱ्यांचे पाऊल गावाकडे’ या अभियानात जिल्हाधिकाऱ्यांनी दलित वसाहतीत मुक्काम करावा अशी मागणीही दलित नेत्यांनी केली.
सर्वांची मते ऐकून घेतल्यावर बोलताना जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ म्हणाले, जिल्हा प्रशासनाच्या वतीने आंबेडकर जयंती अत्यंत उत्साहात भव्य प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीत सर्व खात्यांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. त्यादिवशी मद्यविक्री पूर्णतः बंद ठेवण्यात येईल. सकाळी 9 वाजता आंबेडकर उद्यानातील आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी जाहीर कार्यक्रम होईल. यावेळी अनुसूचित जाती-जमातीच्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
बैठकीला मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, डीसीपी रवींद्र गडादी, समाज कल्याण खात्याच्या संयुक्त संचालिका उमा सालीगौडर, दलित नेते मल्लेश चौगुले, मल्लेश कुरंगी, बसवराज रायन्नागोळ, सिद्दप्पा कांबळे, सिद्राई मेत्री, महेश कोलकार, पृथ्वीसिंग, कल्लप्पा रामचन्नावर, रवी बस्तवाडकर आदी उपस्थित होते.


Recent Comments