Belagavi

डॉ. बाबू जगजीवनराम जयंती दिमाखात साजरी होणार : जिल्हाधिकारी

Share

हरितक्रांतीचे प्रणेते, माजी उपपंतप्रधान दिवंगत डॉ. बाबू जगजीवनराम यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी दिली.

सोमवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी हि माहिती दिली. ५ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या डॉ. बाबू जगजीवनराम यांच्या जयंतीसाठी पूर्वनियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोविडमुळे गेल्या दोन वर्षात जगजीवनराम यांची जयंती अत्यंत साधेपणात आचरणात आणण्यात आली होती. मात्र यंदा हि जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. जयंतीनिमित्त सकाळी मिरवणूक आणि त्यानंतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सर्व तयारी करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीनंतर बोलताना दलित नेते मल्लेश चौगुले म्हणाले, ५ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून मिरवणूक निघणार आहे. राणी चन्नम्मा चौक, बीम्स मार्ग, सदाशिवनगर मार्गे जगजीवनराम उद्यान येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे. मिरवणुकीनंतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याठिकाणी व्याख्यान, एस एस एल सी, पीयूसी मध्ये यश मिळविलेल्या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ देखील आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती चौगुले यांनी दिली.

या बैठकीला अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, समाज कल्याण विभागाचे सहसंचालक उमा सालीगौडर, दलित नेते महांतेश तलवार, मल्लेश कुरंगी, शिवपुत्र मेत्री, बाबू पुजारी, राजू कोलकार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: