Belagavi

शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा पुरवा बेळवट्टी ग्रामस्थांची हेस्कॉमला विनंती

Share

अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे बोअरवेल पंप जळत आहेत. शेतात सकाळी सात वाजताच वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. या समस्येमुळे बेळगाव तालुक्यातील बेळवट्टी ग्रामपंचायत व्याप्तीतील ग्रामस्थांनी हेस्कॉम अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

बेळगाव तालुक्यातील बेळवट्टी ग्राम पंचायत व्याप्तीतील बेळवट्टी, बडस आणि बाकनूर या गावातील ग्रामस्थांच्या वतीने हेस्कॉम च्या मुख्य अभियंत्यांना निवेदन दिले. अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतातील पंपसेट जळत आहेत. पहाटे ४ च्या सुमारास करण्यात येणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा धोका सहन करावा लागत आहे. यामुळे योग्य वेळेत पुरेसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना पितांबर बाबू पाटील या ग्रामस्थाने सांगितले कि, गावातील शेतकऱ्यांना अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. पहाटे ४ ते ११ पर्यंत वीजपुरवठा करण्यात येत असून यावेळेतदेखील योग्य वीजपुरवठा करण्यात येत नाही. यामुळे शेतातील पंप जळत असल्याच्या घटना घडत आहेत. शिवाय सध्या उन्हाळ्याचा मौसम सुरु झाला असून शेतात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होत आहे. या साऱ्या समस्यांचा आणि अडचणींचा विचार करून हेस्कॉमच्या वतीने योग्य वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आपण निवेदनाद्वारे केली असल्याचे ते म्हणाले.

कोविड, पिकाला योग्य भाव नाही अशा परिस्थितीचा सामना करावा लागत असून आता अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळेदेखील शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांच्या या समस्येचा हेस्कॉमने गांभीर्याने विचार करून तातडीने हि समस्या सोडविण्याची विनंती करण्यात येत आहे.

Tags: