Chikkodi

तीन वर्षानंतर चिकोडीतील जलतरण तलाव पुन्हा सुरु

Share

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर गेल्या तीन वर्षांपासून जलतरण तलाव सरावासाठी बंद करण्यात आले होते. चिकोडीमधील जलतरण तलाव देखील गेल्या तीन वर्षांपासून बंद होता. मात्र हा जलतरण तलाव पुन्हा एकदा सुरु करण्यात आल्यामुळे जलतरणपटूंसाठी उन्हाळी पर्वणी झाली आहे. यासंदर्भात आमचे चिकोडी येथील प्रतिनिधी डी के उप्पार यांनी घेतला आढावा पाहुयात या विशेष रिपोर्टमधून….

तीन वर्षांपासून चिकोडी येथील बंद असलेला जलतरण तलाव पुन्हा एकदा सुरु झाल्याने जलतरण प्रेमींची ओढ या तलावाकडे लागली आहे. उन्हाच्या झळांपासून सुटका मिळविण्यासाठी जलतरण प्रेमी या तलावाकडे आकर्षित होत आहेत. २०१६-१७ साली चिकोडी येथील हरीनगर मध्ये आमदार गणेश हुक्केरी यांनी चिकोडी येथील जनतेसाठी जलतरण तलावाची निर्मिती केली होती. मात्र उद्घाटनाच्या काही दिवसातच सदर जलतरण तलाव बंद झाला होता. जलतरण तलावाच्या देखभालीसाठी पुण्यातील अभियंत्याला टेंडर देण्यात आले होते. दरम्यान वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे लॉकडाऊन सुरु झाला आणि जलतरण तलाव बंद झाला. यादरम्यान काही गुंडखोर प्रवृत्तीच्या लोकांनी या जलतरण तलावाभोवती असणाऱ्या काचांवर दगडफेक करून नासधूस केली. कोरोना रुग्णांची संख्या घातल्यानंतर जलतरण तलाव प्रारंभ करण्यासाठी सरकारची परवानगी मिळाल्यानंतर चिकोडी नगरपालिकेने या जलतरण तलावाची दुरुस्ती करण्याचे काम सुरु केले. गेल्या चार दिवसांपासून हा जलतरण तलाव पुन्हा एकदा सुरु करण्यात आला आहे.

डॉल्फिन स्विमर क्लबचे प्रमुख रोहित हेरवाडे आणि राष्ट्रीय जलतरणपटू सुरज यांच्या माध्यमातून येथे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासंदर्भात रोहित हेरवाडे यांनी बोलताना सांगितले कि, या जलतरण तलावाचे १ वर्षाच्या कालावधीसाठी टेंडर घेण्यात आले आहे. गेल्या ६ दिवसांपासून हा तलाव सुरु करण्यात आला असून याठिकाणी सध्या ४० जण पोहण्यासाठी येत आहेत. या जलतरण तलावात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय राष्ट्रीय पातळीवरील जलतरणपटू देखील या तलावात सराव करत आहेत. पुरुषांसह महिलाही या तलावात प्रशिक्षण घेत असल्याची माहिती हेरवाडे यांनी दिली.

या जलतरण तलावाची खोली ५० x ८० इतकी असून एका बाजूला ४ फूट आणि एका बाजूला ६ फूट खोली आहे. जलतरणपटूंना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, वॉश रूम, शॉवर रूम, शौचालय, अंघोळीसाठी स्वतंत्र स्नानगृहे, शौचालय, महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक दिवसासाठी ५० रुपये आणि महिन्यासाठी १००० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. दररोज या तलावातील पाणी बदलण्यात येते. याचप्रमाणे पाण्याचे परीक्षण देखील करण्यात येते. सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत या जलतरण तलावात सरावासाठी वेळ देण्यात येतो. दुपारी २ ते ३ या वेळेत सुट्टी आणि पुन्हा सायंकाळी ६ ते ७ या वेळेत महिलांसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते.

सध्या उन्हाच्या झळा वाढत चालल्या आहेत. शिवाय मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या देखील सुरु झाल्या आहेत. साहजिकच साऱ्यांची पावले जलतरण तलावाकडे वळत असून गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेला हा तलाव पुन्हा एकदा सुरु झाल्याने जलतरण पटूनमधून समाधान व्यक्त होत आहे.

 

Tags: