Belagavi

बेळगावात १२-१४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु

Share

बेळगावात आज १६ मार्च राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक कोर्बोवॅक्स लस देण्याचे अभियान सुरु करण्यात आले. बीम्स इस्पितळात जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांच्याहस्ते या अभियानाचे उदघाटन करण्यात आले.

होय, बेळगावातील बीम्स इस्पितळात बुधवारी सकाळी  १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक कोर्बोवॅक्स लस देण्याच्या मोहिमेला जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांच्याहस्ते चालना देण्यात आली. त्यानंतर बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ म्हणाले, देशात सर्वप्रथम 16 मार्च 1995 रोजी पहिला राष्रीय लसीकरण दिन साजरा करण्यात आला. त्यादिवशी देशात पोलिओ लसीकरण प्रारंभ करण्यात आले होते. याला यश मिळून त्याच्या २ दशकानंतर 2014 मध्ये भारत संपूर्ण पोलिओमुक्त घोषित करण्यात आला. त्यामुळे आज लसीकरण दिनानिमित्त १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक कोर्बोवॅक्स लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. मोठ्यांचे दोन्ही टप्प्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले आहे. राज्यातील केवळ ६ जिल्ह्यांना हा गौरव प्राप्त झाला असून बेळगाव त्यापैकी एक आहे ही अभिमानाची बाब आहे, मुलांनी जराही न घाबरता ही लस घ्यावी असे जिल्हाधिकारी म्हणाले.

यावेळी ‘आपली मराठी’सोबत बोलताना सानिका श्रीकांत रिशबकर आणि संजना देसाई या महिला विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सांगितले की, आमच्या घरातल्यांनी कोवॅक्सिन लस घेतली आहे. लस घेणे चांगले असे सांगितल्याने आम्ही लस घ्यायला आलो आहोत. आम्हाला लस दिलेल्यांचे आभारी आहोत असे सांगितले.

यावेळी आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी असंख्य विध्यार्थ्यांना कोर्बोवॅक्स लस दिली. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, डीडीपीआय बसवराज नलतवाड, लसीकरण अधिकारी डॉ. आय. पी. गडाद, तालुका आरोग्याधिकारी डॉ. शिवानंद मास्तीहोळी, बीम्सचे अधीक्षक डॉ. अण्णासाहेब पाटील, मनपा आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ आदी उपस्थित होते.

 

 

Tags: