Belagavi

बेळगावात शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक

Share

सुपीक जमीन संपादित करून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या पाणी पुरवठा मंडळाच्या निर्णयाच्या विरोधात बेळगावात शेतकऱ्यांनी सोमवारी तीव्र निदर्शने केली. हातात पेट्रोल, लाकडे आणि विळे घेऊन आत्मदहनाचा इशारा दिला

होय, बेळगावातील ओल्ड पी. बी. रोडजवळील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शेत जमिनीत कर्नाटक नागरी पाणी पुरवठा व निस्सारण मंडळातर्फे सांडपाणी प्रक्रिया शुद्धीकरण प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सुपीक जमिनीचे संपादन करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी त्याला प्रखर विरोध केला आहे. आज, सोमवारी हरीकाका कंपाऊंडजवळ प्रकल्पाला विरोध करत शेतकऱ्यांनी हातात पेट्रोल, लाकडे आणि विळे घेऊन जोरदार निदर्शने केली.

यावेळी हातात पेट्रोल घेऊन आक्रमक भूमिका घेत एका महिलेने कर्नाटक नागरी पाणी पूरवठा मंडळाच्या अधिकाऱ्यांवर जोरदार टीकाटिप्पणी केली. तुम्ही सगळे लाचखोर आहात, तुम्हाला कसलीच लाज नाही, आम्ही तुम्हाला एक इंचही जमीन देणार नाही असे ठणकावून सांगितले.

यावेळी घटनास्थळी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. मात्र शेतकरी नेते त्यांच्यावर चांगलेच गरम झाले. पोलीस संरक्षणात जमिनीचे संपादन करण्यासाठी आलेल्या केयूडब्ल्यूएसच्या अभियंत्यांशी त्यांनी वाद घातला. माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुनील पाटील घटनास्थळी भेट देऊन निदर्शकांची समजूत घातली.

यावेळी बोलताना शेतकरी नेते रमाकांत कोंडुसकर म्हणाले, याठिकाणी महादेव गोडसे यांची 2 एकर 4 गुंठे जमीन आहे. त्यापैकी 1 जमिनीत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केयूडब्ल्यूएसने चालविला आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी पीडब्ल्यूडी आणि महापालिकेचे अधिकारी येथे आले आहेत.  2013 मध्येच जमीन संपादन झाल्याचे ते सांगत आहेत. पंतप्रधान मोदी हा कृषिप्रधान देश असल्याचे सांगतात. मात्र येथे अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्रास देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते म्हणून येथे येऊन आंदोलन करत आहोत असे सांगितले.

यावेळी बोलताना शेतकरी नेते राजू मरवे म्हणाले, शहरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जमीन याआधीच संपादित केली आहे. मग पुन्हा जमीन संपादनाची गरजच काय? शेतकरी देशाच्या पाठीचा कणा असल्याचे सरकार म्हणते. पण येथे हा कणाच मोडून टाकण्याची तयारी सुरु आहे. येथील सगळे शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यांच्या जमिनी काढून घेतल्या तर त्यांनी जगायचे कसे? जमिनी घेण्याआधी शेतकऱ्यांचे मत विचारले नाही, त्यांची मान्यता घेतली नाही. हे सगळे असहनीय आहे असा संताप मरवे यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांना न सांगता, करता त्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याच्या प्रयत्नाने शेतकरी संतापले आहेत. त्यामुळेच बेळगावात शेतकऱ्यांच्या संतापाचा आज उद्रेक झाला. यावर सरकार आता काय भूमिका घेणार हे पहावे लागेल.

 

Tags: