Dharwad

निकाल येईपर्यंत थांबायची सहनशक्ती काँग्रेसमध्ये नाही : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

Share

निवडणूक निकालापूर्वीच डी. के. शिवकुमार गोवा पर्यटनाला गेले आहेत. हे म्हणजे, मूल  जन्मण्याआधीच टोपडे शिवण्याचा प्रकार आहे अशी टीका केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली.

हुबळी विमानतळावर रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, ५ राज्यातील निवणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच शिवकुमार गोव्याला गेले. हे एका अर्थाने मूल जन्मण्याआधीच टोपडे शिवण्याचा प्रकार आहे. गोव्यात ते आपले बाहुबल दाखवायला गेले का? तिथून उत्तराखंडला त्यांनी 13 निरीक्षक पाठवले. ते काय कुस्ती करायला गेले होते का? कि गुंडगिरी करायला गेले होते? निकाल येईपर्यंत थांबायची सहनशक्ती काँग्रेसमध्ये नाही अशी टीका जोशी यांनी केली.

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे विसर्जन करावे असे महात्मा गांधी यांनी सांगितले होते. ते काम आता राहुल गांधी करत आहेत. यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो असे सांगत प्रल्हाद जोशी म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजपने अद्भुत विजय मिळवला आहे. एकीकडे समुद्र तटावर विजय मिळवला आहे तर दुसरीकडे टेकाड प्रदेशावर सत्ता मिळवली आहे असे त्यांनी सांगितले.

 पक्षाच्या विविध फळीतील नेत्यांसोबत अनेकबैठक घेण्यात येत आहेत. सुमारे 80 हजार सभा घेतल्या आहेत. उत्तराखंडच्या इतिहासात आमचा विजय मैलाचा दगड ठरला आहे. तेथे गेल्या ५ वर्षांत विकासकामे कशी होत आहेत हे त्यांनी सांगितले. तेथील भाजप सरकारने भ्रष्टाचारमुक्त कारभार दिला. त्यामुळेच पक्षाने बहुमत मिळवत तेथे सत्ता मिळवली आहे. भाजप सर्व निवडणूक गंभोऱ्याने घेतो अशी पुस्ती त्यांनी जोडली.

सहा एप्रिलनंतर कर्नाटकातील निवडणुकीबाबत गांभीर्याने चर्चा करण्यात येणार आहे. विधानसभा आणि लोकसभेचे अधिवेशन सुरु असल्याने सहा एप्रिलपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार, पुनर्र्चना कसलीही चर्चा होणार नाही असेही प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले.

उत्तराखंड निवडणुकीची जबाबदारी समर्थपणे सांभाळून पक्षाला दणदणीत विजय मिळवून दिलेल्या केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे भाजप कार्यकर्त्यांनी हुबळी विमानतळावर मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी आ. अरविंद बेल्लद, अमृत देसाई यांच्यासह पक्षाचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: