Belagavi

युक्रेनमधून जिल्ह्यातील सर्व २१ विद्यार्थ्यांची सुटका : पालकमंत्री गोविंद कारजोळ

Share

युक्रेनमध्ये अडकलेल्या बेळगाव जिल्ह्यातील सर्व 21 जणांची केंद्र आणि राज्य सरकारने सुखरूप सुटका केली आहे. आता ते आपल्या कुटुंबियांसमवेत आपापल्या घरी सुखाने रहात आहेत अशी माहिती जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.

बेळगावात शनिवारी पत्रकारांशी बोलताना जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या बेळगाव जिल्ह्यातील सर्व 21 जणांना त्यांच्या स्वगृही सुखरूप पोहोचविण्याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारने पार पाडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या सर्वाना सुखरूप मायदेशी आणून स्वगृही पोहोचविण्याची व्यवस्था केली. आता ते आपल्या कुटुंबियांसमवेत सुखाने, आनंदाने रहात आहेत. रायबाग, निपाणी आणि कागवाड तालुक्यातील प्रत्येकी 1, मुडलगी, गोकाक, बैलहोंगल आणि चिक्कोडी येथील प्रत्येकी 2, तसेच अथणी व बेळगावमधील प्रत्येकी 5 अशा एकूण 21 जणांना त्यांच्या स्वगृही सुखरूप पोहोचविण्यात आले आहे. त्यांच्या सुटकेसाठी सरकारने 24*7 सहायवाणी सुरु केली होती. शिक्षणासाठी युक्रेनला गेलेल्या विध्यार्थ्यानी आपल्या शिक्षण, अभ्यासक्रमाबाबत घाबरण्याची गरज नाही. तुम्ही धीराने रहा, तुमच्यासोबत आम्ही आहोत असा धीरही मंत्री कारजोळ यांनी यावेळी विध्यार्थ्यांना दिला.

युद्धामुळे शिक्षण अर्धवट सोडून आलेल्या विध्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी सरकार देणार का? या प्रश्नावर मंत्री कारजोळ म्हणाले, याबाबत नियम काय सांगतात हे पाहिले पाहिजे. तशी संधी देता येते का हे पाहून यावर निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

 

 

Tags: