आमची नगरपंचायत असूनदेखील आम्हाला पाणी का पुरविले जात नाही असा सवाल कित्तूरचे लोक विचारत असल्याचा मुद्दा कित्तूरचे आ. महांतेश दौडगौडर यांनी आज विधानसभेत उठवला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारी विधानसभेत बोलताना आ. महांतेश दौडगौडर म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या सहभागीत्वाची जलजीवन मिशन योजना सर्वत्र राबवून घरोघरी नळाद्वारे २४ तास पाणी देण्यात येत आहे. मात्र कित्तूरमध्ये अद्याप ती राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथील लोक यावर सवाल करत आहेत. एम. के. हुबळी आणि कित्तूरला नगरपंचायतीचा दर्जा देऊन ५ वर्षे झाली आहेत. मात्र अद्यापही तेथे जलजीवन मिशन योजना लागू करण्यात आलेली नाही. मतदारसंघातील प्रत्येक ग्रापंमध्ये ही योजना राबवून नळांद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. मात्र कित्तूरमध्ये योजना राबवणे शक्य झालेले नाही. याआधी 126 कोटी रुपयांच्या अनुदानाचा डीपीआर तयार करण्यात आला होता. जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पेयजल आणि निस्सारण खाते आणि नगरविकास खात्याने संयुक्तपणे 59 कोटी रुपयांचा डीपीआर तयार केला आहे. पण अद्याप घरोघरी नळांद्वारे पाणी पुरविणे शक्य झालेले नाही अशी नाराजी व्यक्त केली. सरकारने एक समयसीमा निश्चित करून तातडीने या योजनेच्या कामाला सुरवात करावी अशी मागणी त्यांनी केली.
यावर उत्तर देताना नगरविकास मंत्री भैरती बसवराज म्हणाले, कित्तूर आणि एम. के. हुबळीला 24/7 पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी अंदाजित 59.80 कोटी रुपये अनुदानाची योजना तयार करून नगरपाणी पुरवठा आणि निस्सारण मंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करण्यात आली आहे. लवकरच या योजनेच्या कामाला प्रारंभ करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.


Recent Comments