Belagavi

देशभरात काँग्रेसचा धुव्वा : भाजपचा टोला काँग्रेस मुक्त कर्नाटकाकडे भाजपाची वाटचाल माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी व्यक्त केला विश्वास

Share

आगामी निवडणुकीत आम्हीच सत्तेवर येणार असे विधान करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये सभागृहात रंजक चर्चा झाली. नुकत्याच जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर देशभरात काँग्रेस धुळीला मिळाला आहे. तर आगामी निवडणुकीत देखील आम्हीच सत्तेवर येणार असा विश्वास माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला आहे. यादरम्यान विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी भाजपवर निशाणा साधत हे राजकारण आपल्या राज्यापेक्षा वेगळे असल्याचे सांगितले आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पावर सभागृहात चर्चा सुरू आहे. या दरम्यान माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी कोविड संदर्भात केलेल्या कार्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. यावेळी विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांनी मात्र राज्यावर कर्जाचा बोजा वाढल्याची टीका केली. आपण देखील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदी कार्यरत असताना आठ वेळा अर्थसंकल्प सादर केला असल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले.

यानंतर बोलताना माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले देशातील निवडणुकांचा निकाल पाहता देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या बरोबर आहे, हे स्पष्ट होते. काँग्रेसमुक्त भारत व्हावा असे पंतप्रधानांनीही म्हटले आहे. याचप्रमाणे कर्नाटकदेखील काँग्रेसमुक्त होणार असल्याचा विश्वास येडीयुरप्पा यांनी व्यक्त केला. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करत काँग्रेसला देशभरात पराभव पत्करल्याचे सांगत काँग्रेसला डिवचले. यादरम्यान विरोधी पक्ष नेते सिध्दरामय्यांनी मात्र विरोध केला आणि आपली बाजू मांडली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम बी पाटील यांनी येडियुरप्पा यांना लक्ष्य करत कर्नाटकातील सध्याची परिस्थिती म्हणजे भाजप आणि भाजपा म्हणजे येडियुरप्पा अशी झाली असल्याचे सांगत येडियुरप्पा यांना पदावरून कमी करण्यात आल्याची टीका केली.

विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकालासंदर्भात प्रतिक्रिया दिली. आणि या पाच राज्यातील राजकारण हे वेगळे असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील राजकारणापेक्षा राज्यातील राजकारणातून भाजपाची हकालपट्टी करण्याचे जनतेने ठरविले असून हा आपला भ्रम नाही तर वस्तुस्थिती असल्याची प्रतिक्रिया सिध्दरामय्यांनी दिली.

यानंतर येडियुरप्पांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, आपण वैयक्तिक रित्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आणि बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केले असल्याचे सांगत पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य करत पुढील वेळी देखील काँग्रेस विरोधी पक्षातच बसणार असा टोला लगावला.

यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही येडियुराप्पांची बाजू घाईत येडियुराप्पांना राज्यात असलेल्या जनतेच्या मनातील स्थानाबद्दल समर्थन केले. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेचा वाढत पाठिंबा असून पुढील निवडणुकीत देखील जनता आम्हाला आशीर्वाद देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

विधानसभा अधिवेशनात सुरू असलेल्या अर्थसंकल्प संदर्भातील चर्चेदरम्यान नुकत्याच जाहीर झालेल्या देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालावर रंजक अशी चर्चा झाली असून काँग्रेसच्या झालेल्या पराभवाबद्दल भाजपने सभागृहात पुन्हा एकदा जनता आपल्या पाठीशी असल्याचे सांगत आगामी निवडणुकीत देखील आपणच सत्तेवर येऊ असा विश्वास व्यक्त केला आहे.

Tags: