ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत विठुरायाच्या भक्तिरसात न्हाऊन टाळ–मृदंगाच्या गजरात बेळगाव तालुक्यातील धामणे गावात अश्वांचा रिंगण सोहळा सोमवारी अमाप उत्साहात पार पडला.

होय, ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि विठुरायाचा जयघोष करत वैष्णवांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा अश्वांचा उभा आणि गोल रिंगण सोहळा सोमवारी धामणे येथे भक्तिभावाने पार पडला. माऊली, माऊली असा मुखाने गजर करत हजारो विठ्ठल भक्तांनी यात भाग घेतला. तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज हभप पुंडलिक महाराज देहूकर, हभप पूर्णानंद काजवे महाराज-कोगनोळी, हभप बाळू भक्तीकर महाराज, हभप महेंद्र पाटील महाराज-चिकलवा आदी कीर्तनकारांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. 
सोमवारी पहाटे काकडारती नंतर ज्ञानेश्वरी वाचन करण्यात आले. त्यानंतर सकाळी ८ ते ९ या वेळेत हभप मारुतीमहाराज सांबरेकर-धामणे यांचे कालाकीर्तन झाले. माऊली पालखी आणि आळंदी-पंढरपूर पायी दिंडीतील अश्वांच्या सहभागाने झालेल्या या रिंगण सोहळ्यात धामणे पंचक्रोशीतील अनेक गावच्या दिंडयांनी भाग घेतला. सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी झालेल्या श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा समारोप या रिंगण सोहळ्याने झाला. पारायण सोहळा हभप जोतिबा चौगुले यांच्या अधिष्ठानाखाली पार पडला. सोमवारी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा हजारो भक्तांनी लाभ घेतला.


Recent Comments