राज्यातील रेशन दुकानात आणि अन्यत्र सर्व्हर डाऊनमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा मुद्दा आज विधानसभेत चांगलाच गाजला. अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती याना यावरून सदस्यांनी फैलावर घेतले.

होय, विधिमंडळ अधिवेशनात मंगळवारी प्रश्नोत्तराच्या तासात जेडीएसचे आ. शिवलिंगेगौडा यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणच्या रेशन दुकानात सर्व्हर डाऊनची समस्या मोठ्या प्रमाणात उदभवत आहे. सखल भागात असलेल्या गावांमध्ये ही समस्या अधिक आहे. माझ्या मतदारसंघातील 40-50 खेड्यांत रहिवाशांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावकऱ्यांना अंगठा देण्यासाठी एक दिवस आणि तांदूळ आणण्यासाठी एक दिवस असे दोन-दोन दिवस रेशन दुकानात जावे लागत आहे. त्यामुळे बीएसएनएलशी चर्चा करून ही समस्या सोडविण्याची मागणी त्यांनी केली.
शिवलिंगेगौडा यांना सभापती विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनीही होकार भरला. मलनाड, करावळी भागासह राज्यभरात सर्व्हरची समस्या तीव्र झाली आहे. आमच्या अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य समजेना झाले आहे. खेड्यातील लोक एक दिवसाचे कुलिकाम सोडून रेशन नेण्यासाठी तासनतास रांगा लावून थांबतात. सर्व्हरची समस्या आहे म्हटल्यावर त्यांनी काय करावे? असे सभापती म्हणाले. त्यावर आमदारांनाही आणखी जोश आला. केवळ रेशन दुकानातच नव्हे तर सब रजिस्ट्रार व अन्य सरकारी कार्यालयातही सर्व्हरची समस्या टीवी झाल्याचे आमदारांनी सांगितले.
यावर उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी, याबाबत अहवाल मागवून घेऊन सर्व्हरची समस्या सोडविण्यात येईल, उद्यापर्यंत ही समस्या सुटेल असे सांगितले. पण त्यावर आ. शिवलिंगेगौडा यांचे समाधान झाले नाही. ते म्हणाले, बीएसएनएलची परिस्थिती आता पूर्वीसारखी चांगली राहिली नाही. तिचे महत्व राहिलेले नसून, खासगीकरण होणार आहे. केंद्र सरकारने बीएसएनएलची परिस्थिती सुधारली पाहिजे. एका दिवसात तुम्ही सर्व्हरची समस्या कशी काय सोडवणार? असा सवाल करत मंत्री कत्ती याना धारेवर धरले. अंतिमतः यावर उत्तर देताना मंत्री कत्ती म्हणाले, आ. शिवलिंगेगौडा यांनी सर्व्हरची समस्या सभागृहाच्या निदर्शनास आणली आहे. ती उद्यापर्यंत सोडविण्यात येईल. उद्या सायंकाळपर्यंत ही समस्या सुटेल असे आश्वासन त्यांनी दिले.


Recent Comments