Hukkeri

५ सहकाऱ्यांवर गोळीबार करून बीएसएफ जवानाची आत्महत्या; हुक्केरी तालुक्यातील जुन्या वंटमुरीचा जवान 

Share

मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या कर्नाटकातील बीएसएफच्या जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार करून स्वतःही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पंजाबमध्ये घडली आहे.

ड्युटीवर असताना बीएसएफच्या एका जवानाने आपल्याच ५ सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार करून स्वतःही आत्महत्या केल्याची घटना पंजाबमध्ये काल घडली. सत्याप्पा सिद्दप्पा किलारगी, वय 33 असे या माथेफिरू जवानांचे नाव आहे. तो मूळचा बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील जुनी वंटमुरी गावचा रहिवासी आहे. 13 वर्षांपूर्वी तो बीएसएफमध्ये भरती झाला होता. वैयक्तिक कर्ज आणि कौटुंबिक कारणांमुळे तो खिन्न होता. यातूनच सत्याप्पाने काल 6 मार्च रोजी पंजाबमधील अमृतसरजवळील अटारी सीमेवरील खेसर कॅम्पमध्ये आपल्याच 5 सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली.

सत्याप्पा मानसिक तणावाखाली होता अशी माहिती त्याच्या कुटुंबियांना मिळाली आहे. 6 महिन्यांपूर्वीच तो 1 महिन्याच्या रजेवर आला होता. त्याने एका बँकेतून 10 लाख रुपये कर्ज काढले होते. ते फेडता न आल्याने तो तणावाखाली होता. मानसिकदृष्टया अस्वस्थ झाल्याने रजा संपल्यावरही तो ड्युटीवर हजर झाला नव्हता. कुटुंबीयांनी त्याच्यावर काही दिवस बेळगावात व नंतर धारवाड येथे मनोरुग्णांच्या इस्पितळात उपचार केले होते असे समजते.

उपचारानंतर बरा झाल्यावर पत्नी आणि मुलांसमवेत सत्याप्पा ड्युटीवर हजर होण्यासाठी गेला असता, कॅम्पमध्ये त्याच्या कुटुंबाला प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे त्यांना गावी परत सोडून तो पुन्हा ड्युटीवर हजर झाला होता. कुटुंबियांना सर्व काही सुरळीत होईल असे वाटत असतानाच ही दुर्घटना घडली आहे. सध्या त्याचे कुटुंबीय त्याच्या पार्थिव देहाच्या प्रतीक्षेत आहेत.

 

 

 

Tags: