वीजखांबावर ऑप्टिकल केबल घालताना विजेचा धक्का बसून खाली पडल्याने युवक ठार झाला. ही दुर्घटना बेळगावातील मंडोळी रोडवरील साईराज अपार्टमेंटसमोर रविवारी घडली.
होय, बेळगावातील मंडोळी रोड या विस्तारित वसाहतीत रविवारी सकाळी केबल घालण्यासाठी चढलेल्या युवकाचा विजेचा धक्का बसून खाली पडून मृत्यू झाला. देसाई गल्ली, काकती येथील २५ वर्षीय महेश फकिराप्पा मुत्नाळकर असे मृत युवकाचे नाव आहे. मंडोळी रोड परिसरात सध्या जिओ कंपनीसाठी ऑप्टिकल केबल घालण्याचे काम सुरु आहे. रविवारी सकाळी महेश हासुद्धा साईराज अपार्टमेंटसमोर वीजखांब्याला शिडी लावून केबल घालण्याचे काम करत होता.
त्यावेळी अचानक विजेचा धक्का लागून तो खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी केएलई इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, केबल घालताना खबरदारी न घेतल्याने महेशचा मृत्यू झाला, याला जिओ कंपनीचे व्यवस्थापक राजेसाब दस्तगीरसाब इंडीकर, सूरज हणमंत नायक, विनायक राजशेखर हडगली, अभिषेक शशिकांत बन्नूर हेच जबाबदार असल्याचा आरोप महेशच्या कुटुंबीयांनी केला आहे. वीजप्रवाह सुरु असताना वीज खांबावर काम केल्याने विजेचा धक्का बसून जीवावर बेतू शकते याची कल्पना असूनही निष्काळजीपणा दाखवून त्यांनी महेशला हे काम करायला लावले असे महेशच्या कुटुंबीयांनी टिळकवाडी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार टिळकवाडी पोलिसांनी या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार तपास करीत आहेत.


Recent Comments