बेळगावातील राणी चन्नम्मा विद्यापीठाचा नववा दीक्षांत सोहळा येत्या 9 मार्च रोजी सुवर्ण सौधमध्ये होणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. एम. रामचंद्रगौडा यांनी दिली.

बेळगावातील माहिती खात्याच्या कचेरीत सोमवारी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आरसीयूचे कुलगुरू प्रा. एम. रामचंद्रगौडा म्हणाले, येत्या 9 मार्च रोजी सुवर्ण सौधमध्ये होणार असलेल्या आरसीयूच्या दीक्षांत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल व कुलपती थावरचंद गेहलोत असतील. प्रमुख पाहुणे म्हणून उच्च शिक्षणमंत्री अश्वथनारायण उपस्थित राहणार आहेत. वैज्ञानिक वीरेंद्र चव्हाण दीक्षांत सोहळ्याचे भाषण देणार आहेत.
त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले पद्मश्री राजीव तारानाथ, संगीत क्षेत्रातील डॉ. एच. सुदर्शन, वादिराज देशपांडे यांना विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करून गौरविण्यात येणार आहे असे कुलगुरू प्रा. एम. रामचंद्रगौडा यांनी सांगितले.
आरसीयूच्या यंदाच्या दीक्षांत सोहळ्यात 35,484 विध्यार्थ्यांना स्नातक पदवी तर 2,739 विध्यार्थ्यांना स्नातकोत्तर पदवी प्रदान करण्यात येणार आहे. त्याशिवाय 188 विध्यार्थ्यांना स्नातकोत्तर डिप्लोमा प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत असे कुलगुरू प्रा. एम. रामचंद्रगौडा यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला आरसीयूचे कुलसचिव प्रा. बसवराज पद्मशाली, मूल्यमापन विभागाचे कुलसचिव प्रा. वीरनगौडा पाटील, वित्त अधिकारी प्रा. डी. एन. पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments