बेळगावात आणखी एका युवकाची जाळून हत्या केल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. या युवकाचीओळख पटली असून, सचिन वैजनाथ पाटील, वय ३१, रा. देवगिरी, ता. बेळगाव असे त्याचे नाव असल्याचे समजते.

होय, चंदगडच्या एका युवकाचा बेळगावातील रेणुकानगरमधील एका शेतात गळा आवळून खून करून नंतर त्याचा मृतदेह गवतगंजीत जाळल्याची घटना ४ दिवसांपूर्वी घडली होती. त्याचा छडा माळमारुती पोलीस लावतात न लावतात तोच, अशीच आणखी एक घटना माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीतच उघडकीस आली आहे. राष्ट्रीय महामार्गालगत या युवकाचा खून करून मृतदेह जाळण्यात आला आहे. आज, सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. मृत युवकाचे नाव सचिन वैजनाथ पाटील असे आहे.
३१ वर्षीय सचिन बेळगाव तालुक्यातील देवगिरी गावचा आहे. तो अविवाहित असल्याचे समजते. सचिन बेळगावात स्वयंपाक्याचे काम करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. घटनेची माहिती मिळताच डीसीपी रवींद्र गडादी, एसीपी कट्टीमनी, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वानपथक मागवून खुन्यांचा मागोवा घेण्यात आला. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


Recent Comments